राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केला नजीब मुल्ला यांचा ड्रग्ज माफियासोबतचा फोटो
- खून करुन भाजपच्या आसऱ्याला कोण गेले- शानू पठाण
- एनआयएचा छापा पडलेला इसम कोणाच्या कार्यालयात असतो?- सुहास देसाई
- आनंद परांजपे यांचा ‘महाज्ञानी’ असा उल्लेख- मनिषा कायंदे आणि चुकीचे वृत्त दाखवणाऱ्या वाहिनीवर 100 कोटीचा दावा
मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड आणि ठामपाचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यावर शिंदे गटाच्या मनिषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांचा ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आणि माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी चांगलाच समाचार घेतला. तसेच, ड्रग्सप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केलेल्या टीकेवर भाष्य करताना आनंद परांजपे यांनीही बोट ठेवले होते. त्यावरही देसाई आणि शानू पठाण यांनी खरमरीत टीका केली.
सुहास देसाई म्हणाले की, आमचे नेते डॉ. आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे हे टीका करीत आहेत. परांजपे हे काही दिवसांसाठी राष्ट्रवादीमध्ये वास्तव्यास आले होते. त्यांना डॉ. आव्हाड यांनी मानसन्मान दिला. ते आज विश्वासघात करुन गेले आहेत. त्यामुळे त्यांनी उगाच कुरघोड्या करु नयेत. कारण, आमच्याकडेही अनेक पुरावे आहेत. जर, आम्ही हे पुरावे बाहेर काढले तर त्यांना पळता भुई थोडी होईल. काल मनिषा कायंदे यांनी दाखविलेल्या फोटोंच्या आधारे परांजपे टीका करीत असतील तर सलमान फाळके हा नजीब मुल्ला यांचा नातेवाईक आहे का? फोटो दाखवून आरोप करणाऱ्यांना एकच सांगणे आहे की, उगाच आम्हाला पुरावे सादर करण्यास भाग पाडू नका. गेल्या काही दिवसांपूर्वी एनआयएचे छापे राबोडीत पडले होते. ज्या ठिकाणी छापे पडले ती इमारत कोणी बांधली आहे? ज्याच्या घरावर छापे पडले त्याचे कुणाशी सबंध आहेत? ज्याच्यासाठी एनआयएचे पथक राबोडीमध्ये आले; त्याचा भाऊ कोणाच्या कार्यालयात कोणाचे व्यवहार सांभाळत असतो, हे सर्व जगाला माहित आहे. कोणाचे गुन्हेगारांशी संबध आहेत, याची माहिती आम्हाला आहे. मनिषा कायंदे यांनी आरोप करताना जरा माहिती घ्यायला हवी होती. त्या ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात त्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीदेखील गुंडांसोबत फोटो काढत असतात, त्याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? शानू पठाण यांनीच मुंब्रा भागात अंमली पदार्थांविरोधात रॅली काढली होती. अनेक ड्रग्ज पेडलर्सला पकडून काळे फासले होते.
माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी, ‘‘ नाशिकमध्ये अंमली पदार्थांची फॅक्टरी सापडल्यानंतर काही लोकांचे फोटो शोधून त्यांना अडकवण्याचा कट रचण्यात येत आहे. राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी मोजकेच निवडलेले फोटो काढून लक्ष्य करण्यात येत आहे. आम्ही सर्व शरद पवार आणि डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत असल्यानेच आम्हाला लक्ष्य करण्यात येत असेल तर आम्ही त्यास घाबरणारे नाहीत. मनिषा कायंदे आणि आनंद परांजपे यांना आपले सांगणे आहे की, सलमान फाळके याला अनेकांसोबत फोटो काढण्याची सवय असावी. म्हणूनच त्याचे राजकीय नेते, आमदार, पोलीस अधिकारी यांच्यासोबत फोटो आहेत. मात्र, भाजपच्या वॉशिंगमध्ये जे जाण्यास तयार नाहीत. त्यांना टार्गेट करुन खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 23 फेब्रुवारी रोजीच आपण गृहमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून आपणाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येईल, असे कळविले होते. आपले परांजपे यांना खुले आव्हान आहे की त्यांनी जसे माझ्या व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तशीच मागणी ज्यांचे फोटो फाळकेसोबत आहेत. त्यांचेही व्यवहार तपासावेत. फाळके हा ज्यांच्या कानाजवळ जाऊन बोलत होता. त्यांचे काय धंदे आहेत? बिल्डरला धमकावून, ब्लॅकमेल करुन खंडणी कोण उकळत होता? पोलिसांच्या मदतीने आपले गैरधंदे कोण दाबून ठेवत होता? असे प्रश्न करीत जमील शेख हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर खून करायचे आणि नंतर भाजपच्या जवळ जायचे, ही नीती ज्यांनी आखली आहे; त्यांच्याबद्दलही आनंद परांजपे यांनी भाष्य करावे, असेही आवाहन शानू पठाण यांनी केले.
भाजपमध्ये, शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात गुंडांचा भरणा आहे. भाजपमध्ये राहून गुन्हेगारी करणारे हे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनचे लाभार्थी आहेत. आमच्यावरही असाच दबाव टाकला जात आहे. मात्र, त्यांच्या दबावाला आम्ही बळी पडत नसल्यानेच आमच्यावर असे खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीकाही पठाण यांनी केली.
दरम्यान, आरोप करणाऱ्या मनिषा कायंदे यांच्यावर 100 कोटींचा दावा करण्यात येणार असून तशी नोटीसही बजावण्यात आली आहे. शिवाय, या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतही प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्याचे पठाण यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आदी उपस्थित होते.

Post a Comment