Folowers

275 सफाईमित्रांच्या सन्मानासोबत त्यांस सुरक्षा साधनांसह पीपीई किट प्रदान

 


 

      ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये दररोज समर्पित भावनेने करीत असलेल्या स्वच्छताकर्मींच्या कामाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान व्हावा या उद्देशातून 275 सफाईमित्रांचा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष समारंभात सन्मान करण्यात आला.

सफाईमित्र सुरक्षा शिबीराच्या समारोपाप्रसंगी आठही विभागातील मलनि:स्सारण वाहिन्यांची यांत्रिकी सफाई करणा-या तसेच महानगरपालिकेच्या अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्रांवर काम करण्या-या 275 सफाईमित्रांना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते, शहर अभियंता श्री. संजय देसाई व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, उपअभियंता श्री. वसंत पडघन, अभियंता सर्वश्री स्वप्निल देसाई, वैभव देशमुख व दिलीप बेनके यांच्या उपस्थितीत सन्मानीत करण्यात आले.

      याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी स्वच्छतामित्र व सफाईमित्र यांच्या सेवाभावी कामगिरीमुळेच नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेमध्ये नेहमी अग्रेसर असते अशा शब्दात गौरविले. अशा स्वच्छताकर्मींच्या कामाचा यथोचित गौरव व्हावा ही महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांची मनोभूमिका असून त्यामुळेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाप्रसंगी आयोजित समारंभात आपल्या स्वच्छताकर्मींचा सन्मान व्हावा हा आयुक्त महोदयांचा आग्रह असतो. त्या अनुषंगाने सफाईमित्र सुरक्षा शिबीरांतर्गत ‘सन्मान सफाईमित्रांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच कामगार सुरक्षेला प्राधान्य देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

      यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते बेलापूर विभागातील 39, नेरूळ विभागातील 26, वाशी विभागातील 39, तुर्भे विभागातील 39, कोपरखैरणे विभागातील 22, घणसोली विभागातील 21 व ऐरोली-दिघा विभागातील 8 अशा एकूण 194 मलनि:स्सारण वाहिन्यांची यांत्रिकी पध्दतीने स्वच्छता करणा-या सफाईमित्रांना तसेच मलप्रक्रिया केंद्रावर कार्यरत सफाईमित्रांपैकी सेक्टर 50 नेरूळ येथील 10, सेक्टर 12 बेलापूर येथील 11, सेक्टर 20 सानपाडा येथील 8, सेक्टर 18 तुर्भे वाशी येथील 9, सेक्टर 14 कोपरखैरणे येथील 11, घणसोली येथील 6 व सेक्टर 14 ऐरोली येथील 11 आणि इतर अशाप्रकारे एकूण 275 सफाईमित्रांना फोटोफ्रेम स्वरुपातील प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे कँम्प फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून हेल्मेट, रिफ्लेक्टिंग जॅकेट, ग्लोव्हज, गॉगल व शूज अशा सुरक्षा साहित्यासह सुसज्ज्‍ बॅग तसेच पीपीईकिट प्रदान करण्यात आले. यापुढील काळात सफाईमित्रांसाठी प्रशिक्षिण शिबीरे आयोजित केली जाणार असून त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती करून दिली जाणार आहे.

      प्रत्येक सफाईमित्रास व्यक्तिगतरित्या सन्मानीत करण्यात आल्यामुळे त्यांच्या नजरेत समाधान आणि उत्साह होता. हा सन्मान अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहील अशी भावना सफाईमित्रांकडून व्यक्त करण्यात आली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत