ठाणे पासिंग वाहने टोलमुक्त कराच-आमदार संजय केळकर यांची आग्रही मागणी.
ठाणे पासिंग असलेल्या वाहनांना आनंद नगर नाक्यावर टोलमुक्त करण्यासाठी आमदार संजय केळकर गेल्या पाच वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. संबंधित मंत्र्यांनी सकारात्मक भूमिकाही घेतली होती. सध्या या मुद्द्यावर आंदोलने सुरू असून टोलमुक्ती कराच, अशी आग्रही मागणी श्री.केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला ठाण्यातील आनंद नगर टोल नाका एमएच ०४ वाहनांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. रोज हजारो गाड्या या नाक्यावरून मुंबईत प्रवेश करतात आणि मुंबईकडून ठाण्यात येत असतात. टोल भरण्यासाठी या वाहनांना काही काळ थांबावे लागत असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीही होत असते. त्यामुळे पैसे आणि इंधन याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असतो.
मुंबईत प्रवेश करणाऱ्या मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), मुलुंड (एलबीएस मार्ग) वाशी, ऐरोली आणि दहिसर या पाच पथकर नाक्यांवर पथकर वसुली केली जाते. याचे कंत्राट एम ई पी इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला २० नोव्हेंबर २०१० ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीकरिता २१०० कोटी रुपये घेऊन देण्यात आले होते. २०१९ साली आमदार संजय केळकर यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन टोल मुक्तीची मागणी केली होती. टप्प्या टप्प्याने टोल मुक्ती करताना एमएच ०४ वाहनांना मुंबईत प्रवेश करताना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी आ.केळकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. याबाबत श्री.पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. या मार्गावरील टोल बंद करताना ठेकेदार कंपनीला किती भरपाई द्यावी लागेल, याचा आढावा घेण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.
महविकास आघाडी सरकारच्या काळातही श्री. केळकर यांनी याबाबत आवाज उठवला होता. मुंबई एंट्री पॉइंटवर पथकर नाके पूर्ण बंद करायचे असल्यास ठेकेदार कंपनीला एक रकमी २४९४.२७ कोटी तर पाच टप्प्यांमध्ये ३३०१.०२ कोटींची भरपाई द्यावी लागेल अशी माहिती २०२० ला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री.केळकर यांना पत्राद्वारे दिली होती.
या तीन वर्षात वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली असून आनंद नगर नाक्यावरून पूर्वीपेक्षा तिपटीने वाहने ये-जा करत आहेत. त्यामुळे ठेकेदार कंपनीची वसुली जवळपास पूर्ण झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या हा टोल नाका टोलमुक्त करण्यासाठी आंदोलनेही होत आहेत. या पार्श्वभूमीवर एम एच ०४ वाहने टोलमुक्त कराच, अशी आग्रहाची मागणी आमदार केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Post a Comment