ठाणे महापालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान 2026 चा शुभारंभ
ठाणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घटनात्मक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्य शासनाच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेतर्फे आज ‘सेवा संकल्प अभियान 2026’ चा शुभारंभ उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत महानगरपालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून ‘सेवा परमो धर्मः’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहेत.
या अभियानाच्या शुभारंभा निमित्त महापालिका मुख्यालयात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व मॅमोग्राफी शिबिर, रस्ता सुरक्षा अभियानाच्या लोगोचे अनावरण तसेच ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
*अधिकाऱ्यांनी केले रक्तदान*
रक्तदान शिबिरात महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (1) प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त (2) मेजर डॉ. नितीन राठोड आणि उपायुक्त जी. जी. गोदेपुरे यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून नागरिकांना प्रोत्साहित केले. यावेळी उपायुक्त दीपक झिंजाड, उपायुक्त मधुकर बोडके आणि मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमात महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचला आहे.मोफत आरोग्य तपासणी व मॅमोग्राफी शिबिर महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, मॅमोग्राफी तसेच असंसर्गजन्य आजार (NCD) यांची मोफत तपासणी करण्यात आली. नागरिक तसेच महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.
*रस्ता सुरक्षा जनजागृतीला चालना*
रस्ता सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष रस्ता सुरक्षा अभियानाच्या लोगोचे अनावरण यावेळी करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालकता आणि रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर या अभियानाच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरुवात
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत शहरात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमही सुरू करण्यात आला. यामध्ये डीप क्लीनिंग ड्राईव्ह, कचरा संवेदनशील ठिकाणांची (Garbage Vulnerable Points) स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
9 प्रभाग समित्यांमध्ये 26 प्रकारच्या सेवांचे आयोजन
“राष्ट्रीय सेवा संकल्प” अभियानांतर्गत महिनाभराच्या कालावधीत ठाणे शहरातील सर्व 9 प्रभाग समित्यांमध्ये आरोग्य तपासणी, रक्तदान, अवयवदान नोंदणी, मॅमोग्राफी, पर्यावरणपूरक उपक्रम, स्वच्छता यांसह सुमारे 26 प्रकारच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment