भेटी लागे जिवा... (भाग १)
"ताई, जरा पैसे भरण्याची स्लिप भरून देता का?"
बँकेमध्ये माझ्या समोर बसलेल्या एका महिलेने शेजारी बसलेल्या महिलेकडे मदतीची विनंती केली. काही कारणाने त्यांनी नम्रपणे नकार दिला.
त्या बाईंच्या चेहऱ्यावरची निराशा माझ्या नजरेतून सुटली नाही. मी त्यांना म्हणाले, "द्या वहिनी, मी भरून देते स्लिप ."
त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्लिप भरून दिली. मुदत ठेवींबद्दलची काही माहिती त्यांना मराठीत लिहून हवी होती, तीही लिहून दिली आणि माझं काम पुन्हा सुरू केलं.
तेवढ्यात त्या कुणाशीतरी फोनवर बोलू लागल्या. बोलता बोलता त्यांच्या तोंडून दोन शब्द कानावर पडले—"पंढरपूर" आणि "पाऊस".
फॉर्म भरताना हे दोन शब्द ऐकताच माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. फोन संपल्यावर मी लागलीच त्यांना विचारलं,
"वहिनी, तिकडे पाऊस आहे का? आम्ही वारीला जाणार आहोत म्हणून विचारते."
त्या हसत म्हणाल्या,
"पाऊस आहे, पण कमी होईल. मीसुद्धा आमच्या गावच्या वारीसोबत १३ तारखेला चालणार आहे. माझ्या मुलाला जाऊन आता तीन महिने झाले. त्याचं मासिक श्राद्ध करून मी परत येणार. तीन गावांच्या वाऱ्या करून पुढे पंढरपूरला जाऊन माऊलीचं दर्शन घेईन. इतकी वर्षे हा नेम कधी चुकवला नाही."
हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत दुःख होतं; पण त्याहून मोठी होती पंढरीच्या माऊलीच्या भेटीची ओढ. तरण्याताठ्या मुलाला जाऊन अवघे तीन महिने झाले होते. आईच्या मनावरचं ते दुःख शब्दांत मावणारं नव्हतं. तरीही तिची पावलं विठ्ठलकडेच वळत होती.
त्या क्षणी मला जाणवलं—वारकरी दुःखापासून पळत नाही; तो ते दुःख खांद्यावर घेऊन विठ्ठलाकडे चालत राहतो. कदाचित म्हणूनच वारी माणसाला हलकं करते.
"भेटी लागे जिवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥"
या अभंगाचा अर्थ मला नव्याने उमगला. ती केवळ विठ्ठलाला भेटण्याची आस नाही; ती आपल्या दुःखाला आधार देणाऱ्या त्या माऊलीच्या भेटीची ओढ आहे.
मी त्या माऊलीसाठी बँकेची एक स्लिप भरली होती; पण तिने माझ्या मनात भक्तीचा एक कोरा कोपरा भरून दिला. व्यवहाराच्या रांगेत उभं असताना अध्यात्माची अशी भेट होईल, असं वाटलं नव्हतं.
!! राम कृष्ण हरी!!
पूर्णिमा नार्वेकर, दहिसर
मो. 8920003834

Post a Comment