सर्वसामान्य, गरजूंसाठी मेहनत घेवून पारदर्शकतेने काम करू या - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे,(जिमाका):- शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांचे लोकसेवक आहेत. त्यामुळे सर्वसामान्य गरजूंसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेने काम करू या,असे प्रोत्साहनात्मक उद्गार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे काढले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, भूसंपादन, मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते.
सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी विषयनिहाय महसूल मंत्री महोदयांना संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाचा कामकाज आढावा सादर केला.
याबाबत श्री.बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करणारे शासन आहे. प्रशासन म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्या घटकापर्यंत आपले शासकीय लाभ पोहोचायला हवेत. आपण लोकांचे सर्व प्रकारे रक्षक बनले पाहिजे. आपले काम पारदर्शकपणे मानवी संवेदना जागृत ठेवून करावे. अनावधानाने झालेली चूक निश्चित क्षमापित केली जाईल मात्र विशिष्ट हेतूने, निष्काळजीपणाने, बेफिकीरपणाने केलेली चूक कदापि माफ केली जाणार नाही तर त्याबाबत संबंधिताला कठोरात कठोर शासन मात्र नक्कीच केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रस्त्यांची मोजणी, रस्त्यांचे सीमांकन आधी प्रकारची कामे 26 जानेवारी 2017 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ हे राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकाऱ्यांपैकी एक असल्याचे नमूद करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, त्यामुळे भविष्यातही ठाणे जिल्ह्यात अधिकाधिक चांगली, लोकाभिमुख, नाविण्यपूर्ण कामे होतील,असा विश्वासही व्यक्त केला.

Post a Comment