महाराष्ट्रात लवकरच 'लॅण्ड टायटलिंग ॲक्ट'; मालमत्ताधारकांना मिळणार सरकारमान्य प्रॉपर्टी कार्ड
ठाणे : महाराष्ट्रात मालमत्ता व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी दुबई-सिंगापूरच्या धर्तीवर _'लॅण्ड टायटलिंग ॲक्ट'_ लागू करण्यात येणार आहे, अशी ऐतिहासिक घोषणा महसूलमंत्री *चंद्रशेखर बावनकुळे* यांनी केली.
ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि 'ठाणे शहर सोसायटी मंच'च्या सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी सांगितले की, आगामी डिसेंबरमधील नागपूर अधिवेशनात यावर निर्णय होणार आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
या नवीन व्यवस्थेत प्रत्येक मालमत्ताधारकाला सरकारच्या हमीसह डिजिटल _प्रॉपर्टी कार्ड_ दिले जाईल. त्यात विद्यमान मालक, वारस आणि मालमत्तेचा संपूर्ण तपशील असेल. हे कार्ड देश-विदेशात डेबिट-क्रेडिट कार्डप्रमाणे वापरता येणार आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय:
- आधी मोजणी, नंतर नोंदणी : मोजणीशिवाय कोणताही व्यवहार होणार नाही.
- *व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड* : सोसायटीतील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र कार्ड.
- अकृषक परवानगी रद्द, तुकडेबंदी कायद्यात सुधारणा आणि 2011 पूर्वीच्या पात्र अनधिकृत बांधकामांचे नियमन.
यावेळी आमदार संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्ष सिताराम राणे यांच्या 4 मागण्यांना मंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यात प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंद, वारसदारांना अनावश्यक सुनावणी बंद करणे आदींचा समावेश आहे.

Post a Comment