ठाण्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट: जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
4 जुलै रोजी अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद राहणार; जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश
ठाणे, 03 जुलै 2026: भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी 4 व 5 जुलै रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना शुक्रवार, दि. 04 जुलै 2026 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
कोणत्या शाळा बंद राहणार?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, बालवाडी, तसेच शासकीय/निमशासकीय व सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा उद्या बंद राहतील.
रेड अलर्टचा इशारा
हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार 4 व 5 जुलै रोजी जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणि पुढील अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाची बैठक
तहसीलदार, तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व शालेय शिक्षण विभागाच्या 2019 च्या परिपत्रकान्वये जिल्हाधिकाऱ्यांना हा अधिकार आहे.
पालकांसाठी सूचना:
उद्या दि. 04 जुलै रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत जाऊ नये. अतिवृष्टीच्या काळात घराबाहेर पडणे टाळावे. नदी-नाल्यांच्या परिसरात जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

Post a Comment