Folowers

महापालिका अधिकारी गायब, राहुल पिंगळे व निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसकडून नालेसफाई; प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर प्रश्नचिन्ह

ठाणे: पावसाळ्यापूर्वी वेळेत नालेसफाई न केल्याचा फटका रेतीबंदरमधील नागरिकांना बसला आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरले. मात्र या संकटात ठाणे महापालिका प्रशासनाचे अधिकारी कुठेच दिसले नाहीत. 


जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या महापालिकेच्या बेफिकीर कारभाराविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे आणि रेतीबंदर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी स्वतः हातात फावडे घेऊन रस्त्यावर उतरत तुंबलेले नाले साफ केले व पाण्याचा निचरा करून नागरिकांना दिलासा दिला.


"महापालिकेचे काम काँग्रेसला करावे लागते"

"करांच्या पैशातून चालणाऱ्या महापालिकेने करायचे काम आज काँग्रेसला करावे लागत आहे. ही प्रशासनाची निष्क्रियता आहे," अशी तीव्र प्रतिक्रिया यावेळी राहुल पिंगळे यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबतचा हा हलगर्जीपणा अस्वीकार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?

रेतीबंदरमध्ये नालेसफाईसाठी नेमलेली यंत्रणा व याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की त्यांना पाठीशी घातले जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. वेळेत कामे न झाल्याने दरवर्षी नागरिकांना पावसाळ्यात हाल सहन करावे लागतात.


महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर या घटनेमुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळा तोंडावर असताना जर ही परिस्थिती असेल तर पुढे काय, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत