घोडबंदर रोडवरील वाघबीळ पुलावर धावत्या आयशर टेम्पोला भीषण आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
ठाण्यातील घोडबंदर रोडवर आज सकाळी मोठी दुर्घटना टळली. घोडबंदर ठाणे वाहिनीवरील वाघबीळ पुलावर धावत्या आयशर टेम्पोला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे 6.30 वाजण्याच्या सुमारास आयशर टेम्पो क्रमांक GJ10TY8727 या वाहनाला अचानक आग लागली. वाहन चालक शहा फिरोज शहाबुद्दीन खान (वय 27), रा. हनुमान नगर, उमिया, जिल्हा किशनगंज, बिहार यांनी वाहनातून धूर आणि ज्वाळा दिसताच तत्काळ बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझविण्याचे काम हाती घेतले. काही वेळाच्या प्रयत्नानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
आगीमुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी वाघबीळ पुलाखालून वळविण्यात आली होती. संबंधित वाहन हटविण्यासाठी हायड्रा मशीनची मदत घेण्यात आली.
या टेम्पोमध्ये एक्स्पोर्टसाठी नेण्यात येणारा ब्रास नट-बोल्टचा माल असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. वाहन बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Post a Comment