ठाण्यातील एसआरए अधिकारी बिल्डरधार्जिणे..
आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला संशय
अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी
ठाणे: ठाण्यातील एसआरए प्रकल्पात रहिवाशांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून विकासकांवर कारवाई होत नाही, त्यामुळे ठाण्यातील एसआरए कार्यालयातील अधिकारी रहिवाशांसाठी काम करतात की ते बिल्डरधार्जिणे आहेत, असा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी अशी खळबळजनक मागणी आमदार संजय केळकर यांनी केली.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली. ठाणे शहरात अनेक एसआरए प्रकल्प सुरू आहेत, पण दहा-दहा वर्षे तेथील रहिवाशांना हक्काची घरे मिळत नाहीत, विकासकांकडून त्यांना घरभाडे मिळत नाही. विक्रीची इमारत आधी पूर्ण करुन त्यातील सदनिकांची विक्री केली जाते, मूळ रहिवाशांना मात्र घरांसाठी हेलपाटे मारावे लागतात. लुईस वाडीतील साई आनंद गृहनिर्माण संस्था आणि अजिंक्य महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था दहा वर्षांपूर्वी स्थापन झाल्या आहेत, मात्र अद्याप तेथील रहिवाशांना घरे मिळालेली नाहीत. विशेष म्हणजे संबंधित विकासकांनी आवश्यक तरतुदी पूर्ण केल्या नसल्याने ते विकासक म्हणून पात्र देखील नाहीत. खोटे दस्तावेज, असुरक्षित कर्जे यामुळे धोक्यात आलेले प्रकल्प आणि विकासकांची गुन्हेगारी ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांना दिसत नाही का? असा प्रश्न आमदार केळकर यांनी अधिवेशनात उपस्थित केला. प्रमोटर आणि सल्लागारही विकासकांचे भागीदार असल्याने रहिवाशांना न्याय मिळणार कसा? झोपडपट्टीधारकांना देशोधडीला लावण्याचे काम अधिकारी आणि विकासक करत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला.
ठाणे शहरात असलेल्या एसआरए कार्यालयातील सीईओ हे ठाणे महापालिकेतही वरिष्ठ अधिकारी आहेत. राज्य सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या, मात्र अधिकाऱ्यांनी त्यांचा बट्ट्याबोळ केला. ठाण्यातील एसआरए अधिकाऱ्यांचे विकासकांशीच लागेबांधे आहेत काय, असा प्रश्न निर्माण झाला असून या कार्यालयाच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढण्यात यावी, या अधिकाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्या खासगी मालमत्तेचीही चौकशी करावी म्हणजे त्यांनी केलेला भ्रष्टाचार उघडकीस येईल, अशी मागणी श्री. केळकर यांनी केली.

Post a Comment