flowers

परिचर संवर्गातील २३ कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवक (पुरुष) पदावर पदोन्नती

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे येथे परिचर (गट ड) संवर्गातून आरोग्य सेवक पुरुष (गट क) संवर्गात २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती आदेशांचे वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते करण्यात आले.


या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे तसेच सामान्य प्रशासन विभाग व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पदोन्नती आदेश वितरणानंतर सर्व मान्यवरांनी पदोन्नती कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना शासनाच्या धोरणांप्रती निष्ठा राखण्याचे तसेच ग्रामीण जनतेच्या आरोग्य सेवेसाठी प्रामाणिकपणे व सचोटीने कार्य करण्याचे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदोन्नत कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका अधिक प्रभावीपणे पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.


सदर प्रसंगी पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रमोद पंढरीनाथ घोलप यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “आजचा दिवस आमच्या सेवाकाळातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे. शिपाई (वर्ग-४) संवर्गातून आरोग्य सेवक (पुरुष) पदावर पदोन्नती मिळाल्यामुळे आम्हा सर्वांना नव्या स्वरूपाचे कामकाज करण्यास मिळणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे यशस्वी झाले तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत.”


पदोन्नत कर्मचाऱ्यांनी नवीन पदाची जबाबदारी पूर्ण निष्ठा, प्रामाणिकपणा व कष्टपूर्वक पार पाडण्याची ग्वाही दिली. तसेच जिल्हा परिषद ठाणेच्या प्रगतीसाठी व उद्दिष्टपूर्तीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत