flowers

भर उन्हात वयोवृद्ध सेवानिवृत्त पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन जगायचे कसे? शासनाला विचारला प्रश्न


ठाणे: गेले दोन महिने हक्काची पेन्शन न मिळाल्याने जगायचे कसे? असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त वयोवृद्ध कर्मचाऱ्यां समोर उभा राहिला आहे. पेन्शनच्या मागणीसाठी बुधवारी दुपारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ठाणे शहरातील कार्यालयाबाहेर या कर्मचाऱ्यांनी भर उन्हात धरणे आंदोलन केले. राज्यातील तब्बल १४ हजार सेवानिवृत्त कर्मचारी हे पेन्शनपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना विविध आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी या वयोवृद्ध कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही आमच्या मागण्यांकडे पाठ फिरवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तात्पुरते लेखाशिर्ष, महालेखाकार, मुंबई यांच्या कार्यालयाने गोठविल्यामुळे माहे मार्च २०२६ पासून सेवानिवृत्ती वेतन मिळालेले नाही. त्यामुळे प्राधिकरणातील सेवानिवृत्ती कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे. त्याचा रोष व्यक्त करण्यासाठी महाराषट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्यावतीने राज्यातील संपूर्ण मजीप्रा सेवानिवृत्त कर्मचारी हे मजीप्राच्या विविध कार्यालयासमोर धरणे देऊन निवेदनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. माहे मार्च २०२६ पासून मजीप्रा कर्मचाऱ्यांना २०२६ -२७ च्या अर्थसंकल्पात ४०० कोटी रुपयांची तरतूद असून सुद्धा सेवानिवृत्ती वेतन मिळालेली नाही ही खेदाची बाब असल्याचे कृती समितीच्यावतीने सांगण्यात आले. आज अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे निव्वळ पेन्शनवर अवलंबून असून त्यांना औषधोपचारासाठी पैसे नाही त्यामुळे ते हवालदिल झाले आहे, त्यांची प्रकृती बिघडलेली आहे अशी व्यथा देखील त्यांनी व्यक्त केली. आज आम्हाला एक दिवस धरणे आंदोलन करावे लागत आहे, पेन्शन लवकर न मिळाल्यास हजारोंच्या संख्येने पेन्शनधारक आझाद मैदानावर उपोषण करतील असा इशारा कृती समितीचे सदस्य सिद्धार्थ रोकडे यांनी दिला आहे. पेन्शन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाचा निषेध असो, पेन्शनसाठी कायमस्वरुपी लेखाशिर्ष झालाच पाहिजे, अधिकारी कर्मचारी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा यावेळी दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत