'जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त': महागाईविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक, ठाणे स्टेशन परिसर घोषणांनी दणाणला
- इंधन दरवाढीविरोधात एल्गार: 'रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा'च्या घोषणा
- राजन विचारे यांचा हल्लाबोल: "निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटले"
- ट्रंप बोले, मोदी डोले': परराष्ट्र धोरणावर टीकास्त्र, स्वाक्षरी मोहिमेला प्रतिसाद
- पगार-पेन्शन समर्पित करण्याचे आव्हान: "मंत्री-आमदारांनी लोकलने प्रवास करून दाखवावा"
- मोठी उपस्थिती: केदार दिघे, महेश कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी
ठाणे (18 मे):पेट्रोल-डिझेल, गॅसचे वाढते दर आणि महागाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज ठाणे स्टेशन परिसरात जोरदार आंदोलन केले. 'जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त'... 'ट्रंप बोले, मोदी डोले' अशा घोषणा देत शिवसैनिकांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
विचारे यांचा सरकारवर निशाणा
शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. "पाच राज्यांच्या निवडणुकांत हजारो लिटर इंधन भाजपने प्रचारासाठी वापरले. इंधनवाढ होऊ देणार नाही, असे खोटे आश्वासन दिले आणि निवडणुका आटपताच जनतेला महागाईच्या खाईत लोटून पंतप्रधान परदेश दौर्यावर निघून गेले," असा आरोप विचारे यांनी केला.
"अच्छे दिनच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून हे सरकार केवळ मूठभर उद्योगपतींचे हित जपत आहे. महागाई वाढण्यास सरकारची चुकीची आर्थिक धोरणे आणि अपयशी परराष्ट्र नीती जबाबदार आहे," असेही ते म्हणाले.
"पंतप्रधान मोदी जनतेला तेल, गॅस कमी वापरा, परदेश दौरे करू नका असे सल्ले देतात आणि स्वतः लगेच युरोपीय देशांच्या दौर्यावर निघून जातात. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण अशी अवस्था सरकारची झाली आहे," अशी टीका विचारे यांनी केली.
मंत्री-आमदारांना आव्हान
आंदोलनादरम्यान "जर खरोखरच देशप्रेम असेल, तर सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांनी स्वतःचा पगार व पेन्शन देशासाठी समर्पित करावी. आलिशान गाड्या सोडून लोकल, बेस्ट आणि एसटीने प्रवास करून सामान्यांचे हाल अनुभवावेत," असे आव्हानही देण्यात आले.
यावेळी वाढत्या महागाईविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. जनतेने या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आंदोलनात सहभागी नेते
या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख नरेश मणेरा, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment