flowers

महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत ध्वजवंदन समारंभ उत्साहात




ठाणे, (जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत ध्वजवंदनाचा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. जिल्हा परिषद इमारतीच्या प्रांगणात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजवंदन करण्यात आले.


यावेळी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे गायन केले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत सादर करण्यात आले. संपूर्ण वातावरण देशभक्तीपर घोषणांनी व राष्ट्रप्रेमाच्या भावनेने भारावून गेले होते.


या प्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने व समर्पणाने कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.


या समारंभास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, महिला व बाल कल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, कृषी विकास अधिकारी एम.एम. बाचोटिकर, उप आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. वल्लभ जोशी तसेच जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत