छत्रपती शिवाजी महाराज सुशासन अभियान' अंतर्गत महसूल व भूमी अभिलेख शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
'
ठाणे(जिमाका):- नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा, या उद्देशाने 'छत्रपती शिवाजी महाराज सुशासन अभियान' अंतर्गत विशेष महसूल व भूमी अभिलेख शिबिराचे आयोजन ७ मार्च रोजी करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल आणि भूमी अभिलेख विभागाच्या विविध सेवा सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.
या विशेष शिबिराचे उद्घाटन आमदार श्री. संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र आज प्रगतीपथावर आहे. महसूल आणि भूमी अभिलेख विभाग आता पूर्णतः लोकाभिमुख होत असून, नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही. महाभूमी पोर्टलसारख्या ऑनलाइन सुविधांमुळे प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान झाली आहे."
शिबिरादरम्यान नागरिकांना जमीन मोजणी, नकाशांची उपलब्धता, प्रलंबित फेरफार प्रकरणे, सातबारा उतारे आणि ऑनलाइन अर्जांच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अनेक नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारींबाबत प्रत्यक्ष अर्ज सादर केले, ज्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी जागेवरच तांत्रिक मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी उर्मिला गलांडे, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) नितीन पाटील, तहसिलदार उमेश पाटील, नगर भूमापन अधिकारी सिद्धेश्वर घुले, उप अधीक्षक (भूमी अभिलेख) सचिन वाघ आणि नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासनाच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन प्रशासन सामान्यांसाठी जलद आणि पारदर्शक सेवा देण्यास कटिबद्ध आहे.
विविध गावांमधून आलेल्या शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. अशा उपक्रमांमुळे शासन आणि जनता यांच्यातील संवाद अधिक दृढ होत असून, प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करत असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या.

Post a Comment