flowers

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे महिला सन्मान सोहळा


उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व गुणवंत मुलींचा गौरव

ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका तसेच विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या मुलींचा सन्मान सोहळा दि. ०६ मार्च, २०२६ रोजी बी. जे. हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते रोख पुरस्कार, प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव (भा.प्र.से.) यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागात महिला व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविका यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.


“ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व पर्यवेक्षिका या महिला व बालकल्याणाच्या कार्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. अशा कर्तव्यनिष्ठ महिलांचा सन्मान करणे ही जिल्हा परिषद ठाणेची कृतज्ञतेची भावना आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या कार्याला अधिक बळ देण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे सदैव कटिबद्ध आहे.” - मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव 


या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गलादे-पाटील यांनी उपस्थित महिलांना महिलांचे आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत सजग राहून कुटुंब व समाजाच्या आरोग्यदायी भविष्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी सांगितले की, “अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आणि पर्यवेक्षिका या ग्रामीण भागातील महिला व बालकल्याणाच्या कार्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. अशा कर्तव्यदक्ष महिलांचा सन्मान करणे म्हणजे त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे असून यामुळे इतर महिलांनाही समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.”


या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे, जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, तसेच जिल्हा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित या सन्मान सोहळ्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला असून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत