flowers

ठामपा शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली जगातील सर्वात मोठी दुर्ब‍िण

 ठाणे  : ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025–26 मध्ये विज्ञान विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने विज्ञान मंचातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. 28 फेब्रुवारी या  राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान मंचातील 40 विद्यार्थी व 7 शिक्षकांनी पुणे जिल्ह्यातील खोडद, नारायणगाव येथे भेट दिली. जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणींपैकी एक असलेल्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) या वेधशाळेत शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.


या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना दुर्बिणीची रचना, कार्यपद्धती तसेच अवकाशातील ग्रह-तारे, आकाशगंगा आणि रेडिओ तरंगांच्या माध्यमातून होणारे संशोधन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तज्ञ मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना दुर्बिणीच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक दाखवले आणि अंतराळ संशोधनातील भारताचे योगदान समजावून सांगितले असल्याचे उपायुक्त डॉ.मिताली संचेती यांनी नमूद केले.          

विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दुर्बीण पाहून व वैज्ञानिकांशी संवाद साधून अवकाश संशोधनाबद्दल अनेक प्रश्न विचारले. या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली असून भविष्यात वैज्ञानिक क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाबाहेरील प्रत्यक्ष वैज्ञानिक अनुभव मिळाला आणि राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे समजले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत