flowers

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख संस्थेचे 10 विद्यार्थी यशस्वी

ठाणे  - केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ठाणे महानगरपालिकेच्या कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत प्रशिक्षण या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे महापौरांनी नमूद केले.


          केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दिपाली महतो (RANK 36),अंकिता  पाटील (RANK140), अभिषेक मगदूम (RANK 449),  धनंजय दिघे (RANK529), पारस मेस्त्री (RANK 555), अव‍िष्कार डेर्ले (RANK 591), सिद्धार्थ तगड (RANK 619), शिवम वखारे (RANK 651), मनीष झेंडे (RANK 788 ), प्रणव बेंढारी (RANK 926) यांनी घवघवीत यश प्राप्त केले. हे 10 विद्यार्थी ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेत नियमित प्रशिक्षण घेत होते.


          ठाणे महापालिका संचलित ही संस्था यूपीएससी व एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था असून येथून अनेक विद्यार्थ्यांनी यापूर्वीही यश मिळवून शासनाच्या विविध सेवांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत.


          प्रशासकीय सेवेत महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. संस्थेत सुमारे १४० विद्यार्थ्यांची बॅच असून विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये स्टायपेंड, वसतिगृहाची सुविधा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्वांगीण मार्गदर्शन दिले जाते. देशातील महापालिकांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी असे दर्जेदार प्रशिक्षण देणारी ठाणे महानगरपालिका ही अग्रणी संस्था आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांमध्ये  महाराष्ट्रातील मराठी माणसाचा टक्का हा जास्तीजास्त वाढला पाहिजे. त्यासाठी सीडी देशमुख ही संस्था सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचे संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी नमूद केले.


        दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम, योग्य नियोजन आणि संस्थेच्या मार्गदर्शनाला दिले असून भविष्यात आयएएस, आयपीएस, आयआरएस तसेच इतर केंद्रीय सेवांमध्ये कार्य करत देशसेवा करण्याचा मानस व्यक्त केला आहे.



Off. Contact No. 022-25364779

....................................................................................

Official Website         -   www.thanecity.gov.in

E-mail              - publicrelationtmc@gmail.com

Twitter                         - @TMCaTweetAway

• Instagram                       - @smartcity_thane

• आपत्ती व्यवस्थापन कक्ष     - 1800-222-108/8657887101

• ============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत