ठामपा विरोधी पक्षनेतेपदी शानू पठाण नियुक्ती
आज विपक्षनेतेपद मिळविले, लवकरच सभागृह नेतेपद मिळवू- मनोज प्रधान
ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी सभागृह अन् रस्त्यावर लढू - शानू पठाण
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सुचनेनुसार ठाणे महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अश्रफ (शानू) पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.
ठाणे महानगर पालिकेची आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत विरोधी पक्ष नेतेपदी शानू पठाण यांची नियुक्ती करीत असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी जाहीर केले. त्यानंतर मनोज प्रधान आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेत्यांच्या दालनात प्रवेश करण्यात आला.
याप्रसंगी मनोज प्रधान यांनी, विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारताना आम्हाला फारसा आनंद होत नाही. जेव्हा आम्ही सभागृह नेतेपदावर स्थानापन्न होऊ तेव्हा मोठा जल्लोष करू. शानू पठाण यांनी मागच्या सत्रातही विपक्ष नेते म्हणून दमदार कामगिरी केली होती. यावेळीही केवळ विरोधाला विरोध म्हणून नव्हे तर जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी ते ठामपाच्या सभागृहात लढतील. सभागृहातील लढाई पठाण आणि आमचे नगरसेवक लढतील तर रस्त्यावरची लढाई आम्ही लढू, असे सांगितले.
दरम्यान, शानू पठाण यांनी, या शहरात पाणी, रस्ते, साफसफाई हे मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत. या प्रश्नांसाठी आपण लढणार आहोतच; शिवाय, शिक्षणाच्या विषयावरही सत्ताधाऱ्यांशी आमचा संघर्ष असणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून चांगली कामे झाली तर आम्ही त्याचे कौतूक करूच; पण, ते जनतेच्या हिताला बाधा आणत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही, असे स्पष्ट केले.

Post a Comment