जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टतर्फे खारेगावमध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा; आरोग्य शिबिर, ऐतिहासिक माहितीपट आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने वेधले लक्ष
ठाणे - छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातील खारेगाव (९० फूट रोड) येथे 'जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट'च्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील सर्वात मोठा शिवजयंती सोहळा म्हणून गौरविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला हजारो शिवप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली.
आरोग्य शिबिर आणि कलागुणांना वाव
सकाळी शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन या मंगलमय सोहळ्याची सुरुवात झाली. या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री आरोग्य शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून २०० हून अधिक नागरिकांनी या आरोग्य सुविधेचा लाभ घेतला. तसेच, बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक सन्मानचिन्ह आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
शिवमय मिरवणूक आणि 'शिवाजी राजा माझा'
सायंकाळी शिवताल ढोल पथकाच्या निनादात आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांची दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण खारेगाव परिसर शिवमय झाला होता. यानंतर समीर दळवी आयोजित 'शिवाजी राजा माझा' या विशेष सांगीतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात गाणी आणि पोवाडे सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. लोकव्याखानकार प्रा. विशाल गरड यांच्या शिवचरित्र- जीवनाचे सुत्र ह्यावरील व्याखानाने झाला.
१२ किल्ल्यांच्या माहितीपटाचे सादरीकरण
कार्यक्रमाचे एक प्रमुख शैक्षणिक आणि ऐतिहासिक आकर्षण म्हणजे आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला विशेष माहितीपट. 'युनेस्को'च्या जागतिक वारसा यादीत समावेश झालेल्या १२ किल्ल्यांचा इतिहास ऑडिओ-व्हिज्युअल आणि इन्फो-वॉलच्या माध्यमातून उलगडण्यात आला. विशेष म्हणजे, या अभ्यासपूर्ण माहितीपटाचे संकलन आणि लेखन केबीपी महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष गावडे यांनी केले, ज्याला प्रा. संभाजी शेळके आणि ॲड. मनोज बडगुजर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
'जनस्वराज्य समाज रत्न' पुरस्काराचे वितरण
या सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक श्री. राजाराम साळवी यांच्या भरीव सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांना मा. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते 'जनस्वराज्य समाज रत्न २०२६' या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, 'प्रत्येकाने दुर्गसेवक होऊन आपल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करावे', असा मोलाचा संदेश आमदार संजय केळकर यांनी दिला.
मान्यवरांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला ठाण्याचे उपमहापौर श्री. कृष्णा पाटील, ॲड.संदिप लेले, श्री. दशरथ पाटील, नगरसेवक श्री संजय वाघुले, श्री. मनोहर डुंबरे, ॲड. सौ. अनिता गौरी, विजया लासे, श्री. मंदार केणी, विकास पाटील व श्री सचिन मोरे, विजय पाटील, नरेंद्र शिंदे, विजय शिंदे, उमेश पाटील, विलास साठे, विक्रम भोईर यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. राजन पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री. मंजित जाधव, अमित नाईक, किरण पाटील, जगदीश पाटील, सुनिल पाटील, हेमंत पाटील, प्रशांत तळवडेकर, नितीन बुबेरा, धनंजय परब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. शेवटी, या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल अध्यक्ष राजन पाटील यांनी सर्व मान्यवर आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या ठाणेकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

Post a Comment