ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’


२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

दll (जिल्हा परिषद, ठाणे) – सिकलसेल अ‍ॅनिमिया आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’ राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय सिकलसेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशनअंतर्गत ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हा आजार समूळ नष्ट करण्याच्या उद्देशाने हे अभियान १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत प्रभावीपणे राबविले जाणार आहे.


हे अभियान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनानुसार राबविले जात आहे.


ठाणे जिल्ह्यात हे अभियान जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राबविले जाणार असून, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.


*अभियानाचा उद्देश व सद्यस्थिती*

सिकलसेल अ‍ॅनिमिया हा एक गंभीर आणि अनुवंशिक रक्तविकार असून या आजारामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बदलून कोयत्यासारखा (Sickle) होतो. परिणामी रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन रुग्णांना तीव्र वेदना, संसर्ग आणि जीवघेण्या गुंतागुंतींचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने २०४७ पर्यंत सिकलसेल अ‍ॅनिमिया आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.

ठाणे जिल्ह्यात ० ते ४० वर्ष वयोगटातील एकूण लोकसंख्या सुमारे १३ लाख असून यापैकी ४ लाख ५२ हजार नागरिकांची तपासणी यापूर्वीच करण्यात आली आहे. उर्वरित नागरिकांची तपासणी या विशेष अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात १,८५७ सिकलसेल वाहक (Carrier) आणि ११४ सिकलसेल रुग्ण (Sufferer) आढळून आले आहेत. पुढील पिढीमध्ये या आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी व्यापक तपासणी व जनजागृती करणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.


*अभियानांतर्गत उपलब्ध मोफत सुविधा*

१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८ ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये खालील सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

1. मोफत तपासणी –

० ते ४० वर्ष वयोगटातील नागरिकांची सोल्यूबिलिटी टेस्ट तसेच निदानासाठी एच.पी.एल.सी. (HPLC) तपासणी.

2. मोफत उपचार –

सिकलसेलग्रस्त रुग्णांना हायड्रॉक्सीयुरिया, फॉलिक अ‍ॅसिड औषधे व आवश्यकतेनुसार मोफत रक्त संक्रमण.

3. आर्थिक सहाय्य –

पात्र सिकलसेलग्रस्त रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळवून देणे.

4. समुपदेशन सेवा –

विवाहपूर्व व प्रसूतिपूर्व समुपदेशनावर विशेष भर देऊन सिकलसेलग्रस्त बालकांचा जन्म टाळण्यासाठी मार्गदर्शन.


जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः आदिवासी बांधवांना आवाहन केले आहे की, लग्नाआधी व लग्नानंतर प्रत्येक दांपत्याने सिकलसेल तपासणी करून घ्यावी. सिकलसेल वाहक किंवा रुग्ण व्यक्तींनी विवाहपूर्व योग्य समुपदेशन घेऊन पुढील पिढी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी.


“तपासणी म्हणजे भीती नव्हे, तर सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी उचललेले पहिले पाऊल आहे.” सुदृढ व सिकलसेल मुक्त ठाणे जिल्हा घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.


चला तर मग, ‘सिकलसेल मुक्त ठाणे जिल्हा’ या संकल्पनेसाठी आपण सर्वजण एकत्र येऊया.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत