मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकणार नाही*

मुंबई - धारावी पुनर्विकास प्रकल्प, नवी मुंबई विमानतळाचे काम मुख्यमंत्री असताना अदानींना कोणी दिलं. हरपत्तीची गरज असल्यानेच त्यांना उद्योगपती आठवू लागलेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा व राज ठाकरेंवर केली. भाजप रिपाई महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते. 


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उद्योगपतीच्या नावे फेक नरेटिव्ह सुरु आहे. मात्र मुंबईतील मोकळी मैदानं आणि भूखंड उद्योगपतींना कोणी दिले, दोन वर्षांपूर्वी कलानगरला कोण भेटायला गेलं होतं, असे सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. सत्तेत असताना एक भूमिका आणि सत्तेतून उतल्यावर दुसरी भूमिका हा यूटर्न कशासाठी असे ते म्हणाले. उद्योगपतींवर टीका करता तरिही त्यांना घरी जेवायला बोलवता, तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात, अशी खरमरीत टीका शिंदे यांनी केली. कंटेनर हवे असल्यामुळेच ते उद्योगपतींवर बोलत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महायुतीसाठी मुंबई फर्स्ट आणि मुंबईकर फर्स्ट हाच अजेंडा आहे, असे ते म्हणाले. 


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसे युतीवर सडकून टीका केली.   आमच्या वादापेक्षा महाराष्ट्रा मोठा म्हणणारे २० वर्षांपूर्वी वेगळे झाले,  तेव्हा तुमच्यासाठी महाराष्ट्र छोटा होता का? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही कारण बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ आणि अहंकार मोठा होता, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा मनसेवर केला. मराठी माणसावर असलेले तुमचं प्रेम पुतना मावशीचं आहे. स्वार्थासाठी वेगळे झालात आणि स्वार्थासाठी एकत्र झालात हे मुंबईकर जनता जाणते, असा टोला शिंदे यांनी लगावला. कालच्या सभेत नेहमीप्रमाणे टीका, टोमणे मारुन गेले. त्यांच्याकडे आता काही मुद्देच नाहीत. विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबईचे स्वप्न पूर्ण करतोय. मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि ती दिसलीही पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे व्हीजन घेऊन आपण पुढे चाललोय. यापुढेही विकास हाच अजेंडा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


तुमच्या भावाचे नगरसेवक फोडले तेव्हा तुम्ही किती दानदक्षिणा घेतली. आम्ही आयत्या बिळावरचे नागोबा नाहीत. कार्यकर्त्यांमधून मोठे झाले आहोत. सत्तेवर पाणी सोडून गेलो, तुमचे काही घेऊन गेलो नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मराठी माणसाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठित खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले. तुमच्या काळात मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, हे अपयश कोणाचे ते सांगायला हवं. मुंबईसाठी मराठी माणसासाठी तुम्ही सत्तेत असताना काय केलं, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. मराठी माणसाचं अस्तित्व कधी धोक्यात नव्हतं आजही नाही आणि उद्याही राहणार नाही, असा निर्वाळा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. मराठी माणूस आमच्या सोबत आहे, असे ते म्हणाले. निवडणूक आली की मराठी माणूस आठवतो. एरव्ही मराठी माणसाकडे ढुंकून पाहत नाही. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स ते करतात, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मुंबई काही रेल्वेचा डबा नाही कुठेही काढला आणि कुठेही जोडला. 


मुंबईतील मराठी माणसाचे महत्व कधीही कमी होणार नाही. मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला मुंबईत आणल्याशिवाय शांत बसणार नाही. आम्ही हवेत बोलत नाही तर आमचं काम बघा, असे ते म्हणाले. २० हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला. पागडीमुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. फनेल झोनमधील अडकलेले पुनर्विकासाचे प्रकल्पांचा मार्ग मोकळा केला. १७ क्लस्टर डेव्हलपमेंट, झोपडपट्टीमुक्त मुंबई, पुढल्या वर्षभरात मुंबई खड्डेमुक्त होईल. महायुतीने १० ते १२ हजार गिरणी कामगारांना घरे दिली. एक लाख गिरणी कामगारांना घरे देणार आहोत. आम्ही घर भऱणारे नाही तर लोकांना घर देणारे आहोत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 


ते पुढे म्हणाले की, विकास विरोधी लोक आपण पाहिले.पुनर्विकासाच्या कामांमुळे त्यांना खोकला झाला. पण वर्षानुवर्ष झोपडपट्ट्या आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या गरिबांच्या आजारपणापेक्षा त्यांना स्वत:च्या खोकल्याचे कौतुक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. महाविकास आघाडीने अनेक प्रकल्पांत स्पीड ब्रेकर टाकला. मेट्रो ३ चे काम रोखले. यामुळे १० हजार कोटींचा खर्च वाढला. कोण कुठे जन्माला आलं यापेक्षा सर्वसामन्यांकरिता कोण पोटतिडकीनं काम करतं हे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. पहलगामधील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते लंडनच्या थंड हवेत थंड बसले होते. हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तातडीनं परदेश दौरा सोडून मायदेशी परतले पण ते मात्र लंडनमध्येच राहिले, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. 


तुम्ही करुन नाही तर खाऊन दाखवलं

सगळीकडे आम्ही केलं म्हणतात. पण त्यांनी फक्त खाऊन दाखवलं कोणी कोविडमध्ये रुग्णांची खिचडी खाऊन दाखवली. बॉडीबॅगचे पैसे, कोविड सेंटरचे पैसे, मिठीचा गाळ, रस्त्यावरच डांबर खाऊन दाखवलं. मराठी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून दाखवलं, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. रोमील छेडाला टेंडर दिल्यावरुन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. महायुतीची कामं चोरणारी कामचोर टोळी सक्रिय झालीय, असे ते म्हणाले. करुन दाखवलं पेक्षा खाऊन दाखवलं याचे होर्डिंग्ज लावा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत