तरुणाईच्या सर्जनशीलतेला वाव देणारा ठाणे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न

 


   ठाणे (जिमाका):-* क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे आणि बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे जिल्हास्तर युवा महोत्सव शुक्रवार, दि.०७ नोव्हेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

     युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करते. विविध कला, संस्कृती आणि साहित्य क्षेत्रातील कौशल्य सादर करण्यासाठी जिल्हाभरातील 15 ते 29 या वयोगटातील तरुणांनी मोठ्या संख्येने महोत्सवात सहभाग नोंदविला.

     तरुणाईला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करीत अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील म्हणाले की, नव्या पिढीतील ऊर्जा, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाण हीच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा निश्चित करणारी ताकद आहे.

     जिल्हा युवा महोत्सवाकरीता महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती विंदा मांजरमकर, जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या डॉ.सुचित्रा नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     महोत्सवाच्या उदघाटनाची सुरूवात बालगंधर्व पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्राचा लावणी सम्राट नवी मुंबई भूषण २०२१ व नवी मुंबई कला भूषण २०२३ श्री. अशिमिक कामठे यांच्या बहारदार लावणीच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर कार्यालयाद्वारा आयोजित जिल्हास्तर युवा महोत्सवाकरीता समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, कथा लेखन आणि कविता लेखन, विज्ञान व तंत्रज्ञान आधारीत प्रकल्पांचे सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपली उत्कृष्ट कला, अभिव्यक्ती आणि कल्पकता सादर करत परीक्षकांची दाद मिळवली.

     स्पर्धेकरीता सहभागी व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि विजेत्यांना रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. महोत्सवाने तरुणांमधील कलात्मकता आणि प्रतिभेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. 

     ठाणे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांच्या पुढाकारातून यशस्वीरित्या पार पडले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत