रखडलेल्या पेन्शन योजनेचा लाभ दिव्यांगांना लवकरच मिळणार
आमदार संजय केळकर यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
ठाणे - कागदपत्रांमधील त्रुटी आणि लाल फितीत अडकलेली दिव्यांग अर्जदारांची संजय गांधी निराधार योजनेची सर्व प्रकरणे डिसेंबरअखेर मार्गी लावण्यात येणार असून दरमहा २५०० रुपये निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार संजय केळकर यांनी घेतलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांना विविध समस्यांची निवेदने प्राप्त झाली. सुमारे ५५ दिव्यांग बांधवांनी श्री.केळकर यांची भेट घेऊन संजय गांधी निराधार योजनेंतर्गत पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार केली होती. आज श्री.केळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केले होते. दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी काढण्यात आल्या आहेत तसेच लाल फितीच्या कारभारात त्यांची प्रकरणे रखडलेली असून राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. ही सर्व प्रकरणे आवश्यक दुरुस्त्या करून ३० नोव्हेंबरपर्यंत मंजूर करण्यात येतील आणि डिसेंबरमध्ये या योजनेचा लाभ दिव्यांग बांधवांना मिळेल, असा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे शेकडो दिव्यांग बांधवांना निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, राज्य शासनाच्या अनेक योजना पुढे येतात, पण अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा त्याचा लाभ नागरिकांना मिळतो. दिव्यांगांची रखडलेली प्रकरणे मंजूर करण्यासाठी विशेष बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावला आहे. या दिव्यांग बांधवांना महिना २५०० रुपये पेन्शन मिळणार असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार आहे.
नालासोपारा येथील इमारत १० वर्षांपूर्वी पाडण्यात आली. आजतागायत तेथील रहिवाशांना घरे मिळाली नाहीत. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. वारसा हक्काबाबत मुंबई महापालिकेच्या विविध भागात सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील आज श्री.केळकर यांची भेट घेत गाऱ्हाणे मांडले. मुंबई महापालिका आयुक्तांची लवकरच भेट घेऊन पात्र कर्मचाऱ्यांचा वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले.
आज झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सायबर फसवणूक, एसआरए योजनेतील फसवणूक, वारसा हक्क आदींबाबत निवेदने प्राप्त झाली. त्यावर तत्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, माजी उपमहापौर अशोक भोईर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, दिव्यांग सेल चे आनंद बनकर, राजेश गाडे, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment