भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार
ठाणे - उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असुन ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणुक करीत आहे. असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ठाणे शहर - जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणाने पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
ठाणे महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी, या लाचखोर पाटोळेच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनेच केला होता. याची आठवण करून दिली. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरु झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली ? असा सवाल चव्हाण यांनी केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत. प्रशासनाने अनधिकृत बांधकामाची शास्ती माफ केली आहे. याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या १९ प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थातुर मातुर उत्तरे देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा, पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे .
लाचखोर पाटोळेला बडतर्फ करा
२५ लाख रुपयांची लाचप्रकरणी अटकेत असलेला ठाणे महापालिकेचा लाचखोर निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे याच्या चौकशीवर सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे लाच प्रकरणातील त्यांचे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सॲप कॉल डिटेल्स देखील तपासले गेले पाहिजेत. तसेच एसीबीने पाटोळे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याबरोबरच पाटोळेच्या नातेवाईकांची देखील ईडी मार्फत चौकशी करावी, जेणेकरून भ्रष्टाचाराच्या मार्गाने किती माया जमवली याचा हिशोब उघड होऊन पाटोळेला अभय देणारे महापालिकेतील अधिकारी व राजकीय पुढारी यांचीही नावे समोर येतील. निलंबनाऐवजी पाटोळेला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी काँग्रेस करणार असुन मागणी मान्य न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.

Post a Comment