प्रशिक्षित बेरोजगार भडकले... तर, सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही


मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची एकनाथ मामाच्या गावी धडक

   ठाणे :मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र, ११ महिने प्रक्षिणार्थी म्हणुन काम केल्यानंतर बेरोजगार युवाशक्तीला महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने केल्यानंतरही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील - चाकुरकर यांच्या नेतृत्वाखाली ३६ जिल्हयातील हजारो सुशिक्षित प्रशिक्षणार्थी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ मामाच्या गावी धडकले. ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या युवाशक्तीने यल्गार करीत येत्या आठवड्याभरात ठोस निर्णय घेतला नाही तर, सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा देत यापेक्षा पाचपट संख्येने पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

     राज्यात पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजने पाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी (लाडका भाऊ) योजना राबवली. या अंतर्गत, १० लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतीमाह ६ हजार व १० हजार मानधन देण्यासोबतच सेवेत कायम करण्याचे आश्वासन वेळोवेळी दिले होते. मात्र, १३ आंदोलने करूनही विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थी आजघडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडल्याने हजारो प्रशिक्षणार्थीनी रविवारी (दि.१२ ऑक्टो.) लाडक्या बहिणींचे भाऊ अर्थात एकनाथ मामाच्या गावी ठाण्यात धडक मारली. तसेच, एकनाथ मामाने आपल्या भाचा - भाचींना फसवल्याचा आरोप करीत संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील - चाकुरकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्तावर ठिय्या मारला. यावेळी बेरोजगार प्रशिक्षणार्थीनी फलक झळकवुन घोषणाबाजी केली. प्रशिक्षणार्थी बेरोजगारांना कायमस्वरूपी रोजगार द्या, मानधनात दुप्पट वाढ करा तसेच, येत्या अधिवेशनात रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा करा, आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. दरम्यान, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील - चाकूरकर यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे चाकुरकर - पाटील यांनी सांगितले. जर या आंदोलनानंतरही सरकारने आश्वासन पाळले नाही. तर, आमची दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही येणारी दिवाळी साजरी करू देणार नाही. असा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेने सरकारला दिला आहे.

  या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज , मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचे प्रकाश साबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे, लातुर जिल्हाध्यक्ष अनिकेत मांदळे, जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे, विकी पाखरे, अकोला जिल्हाध्यक्ष पवन भट, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष निलेश वसावे, रायगडचे ऋषी पवार, सातारा जिल्हाध्यक्ष प्रविण माने आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत