गावातील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलीची मागणी करताच २४ तासात केले सायकलींचे वाटप


ग्रामस्थानी मानले उपमुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार

धाराशिव (साडेसगावी) - जिल्ह्यातील भूम तालुक्यातील साडेसांगवी गावातील ग्रामस्थांना आज वाचनाचे मोल जाणणाऱ्या आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून परिचित असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कामाचा प्रत्यय आला. काल गावात आलेल्या शिंदे यांनी गावातील मुलींनी त्यांच्याकडे केलेली एक छोटी मागणी त्यांनी अवघ्या २४ तासांच्या आत पूर्ण करून या मुलींना आनंदाचा सुखद धक्का दिला. 


मराठवाड्यामधील सर्वच जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यातही धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांचे या पुरात अतोनात नुकसान झाले आहे. या पुराची परिस्थिती जाणून घेण्यासाठी कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारशिवचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी भूम तालुक्यातील साडेसांगवी गावाला देखील भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली होती. तसेच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांना तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. काल या गावातून निघत असताना अचानक काही मुलींनी धाडस करून शिंदे यांची वाट अडवली, यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी सायकलची गरज असल्याचे त्यांना सांगत सायकल देण्याची विनंती केली. यावेळी शिंदे यांनी तुम्हाला सायकल देतो असे सांगून ते या गावातून निघून गेले. 


इतर नेते देतात तसेच शिंदे यांनीही आश्वासन दिले आणि ते निघून गेले असावे असे या मुलींना वाटले असेल,

मात्र स्वस्थ बसतील ते शिंदे कसले, त्यांनी तत्काळ चक्र फिरवून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण यांना या मुलींना तत्काळ सायकल नेऊन देण्यास सांगितले. 


आज लगेचच साडेसांगवी गावात एक ट्रक येऊन उभा राहिला. या ट्रकमध्ये नक्की काय आहे ते पाहण्यासाठी ग्रामस्थानी एकच गर्दी केली. या ट्रकमध्ये सुंदर नव्याकोऱ्या सायकली होत्या. युवासेनेचे लिंबाजी जाधव यांनी तत्काळ गावातील मुलींना बोलवून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तुम्ही काल केलेली मागणी त्यांनी आज पूर्ण केली असल्याचे सांगितले. तुम्हा सर्व जणींसाठी त्यांनी सायकल पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. या रंगीबेरंगी सायकल पाहून या मुली भलत्याच खुश झाल्या. आता शाळेत जाण्यासाठी दररोजची पायपीट करावी लागणार नाही याचा विलक्षण आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. त्यांनी मनोमन शिंदे साहेबांचे आभार मानले.


यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे या मुलींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलींना तुम्ही मला म्हणालात म्हणून मी लगेच तुमच्यासाठी सायकल पाठवल्या आहे, मात्र आता भरपूर अभ्यास करा आणि खूप मोठ्या होऊन आईवडिलांचा आणि आपल्या गावाचे नाव मोठे करा असे त्यांना सांगितले. तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनीही व्हिडिओ कॉल करून या मुलींचे कौतुक केले आणि आता शाळेत जाण्यासाठी तुम्हाला अजिबात पायपिट करण्याची गरज नाही असे सांगत त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


गावात येऊन नुसती पाहणी करून परतणारे अनेक पुढारी आजवर पाहिले, मात्र दिलेला शब्द खरा करून दाखवणारा नेता आज प्रत्यक्ष पाहायला मिळाला असल्याचे मत साडेसांगवी गावचे सरपंच सुभाष देवकते यांनी व्यक्त केले. काल आमच्या गावातील मुलींनी मागणी केली काय आणि २४ तासात ती मागणी पूर्ण झाली काय हे आमच्यासाठी खरोखरच नवीन आहे. त्यामुळे गावातील आमच्या लेकी बाळींची ही मागणी तत्काळ पूर्ण केल्याबद्दल आम्ही सर्व साडेसांगवी गावातील ग्रामस्थ उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत