मो. ह. विद्यालय ठरली नेने ढाल विजेती शाळा
ठाणे - जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर या शैक्षणिक संस्थेला १३४ वर्षांची जुनी परंपरा आहे. संस्थेचे आद्य संस्थापक कै. गो. ना. अक्षीकर यांच्या १६१ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या ४९ शाळांमधून ठाण्यातील मो. ह. विद्यालयाला मानाची नेने ढाल मिळाली. यामुळे मो. ह. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
संस्थेचे आद्य संस्थापक कै. गो. ना. अक्षीकर यांचा २५ सप्टेंबर हा जन्मदिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी ठाणे येथील मो. ह.विद्यालयात २५ सप्टेंबर या दिवशी कै. गो. ना. अक्षीकर यांची १६१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी अक्षीयन या ई मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची उंची तेंव्हा वाढली जेव्हा Ai च्या माध्यमातून शाळेच्या वास्तूत खुद्द अक्षीकर गुरुजी फिरताना दिसले.
संस्थेच्या ४९ शाळांमधून १० वी मध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला अक्षीकर स्कॉलर म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. माजी अक्षीकर स्कॉलर सौ.सायली महाजन पाटील या मो.ह.विद्यालयातील माजी विद्यार्थिनीच्या हस्ते या वर्षीची अक्षीकर स्कॉलर कुमारी धोंगडे संजना (सुभेदार वाडा,कल्याण.) हिला गौरविण्यात आले.
संस्थेतील इ. १० वी व १२ वीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांना एकत्र मिळून गुरू शिष्य पारितोषिक दिले गेले. इ.५ वी व इ.८ वी च्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना व त्यांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला .
शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वात जास्त विद्यार्थी यशस्वी होणारी शाळा म्हणून कै.सुशांत वैद्य स्मृती ढाल, सुभेदार वाडा (कल्याण) या शाळेस मिळाली.
इ.१० वी इंग्रजी माध्यम सर्वाधिक टक्केवारी असलेली शाळा म्हणून कै. इंद्रसिंह चंद्रसिंह राजपूत ढाल, इंग्रजी माध्यम शाळा, उरण (दहावी १०० %निकाल) या शाळेस मिळाली.
इ.10 वी CBSE सर्वाधिक गुण मिळवणारी शाळा म्हणून कै.चंद्रकांत नारायण सुतार ढाल, ब्लॉसम इंग्लिश मिडीयम स्कूल, डोंबिवली (१० वी निकाल १००% ) व अग्रवाल ढाल, हायस्कूल सुभेदार वाडा, कल्याण (दहावी निकाल - मराठी माध्यम ९६.६१ % ) या शाळेस मिळाली.संस्थेतील शालांत परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणारी मराठी माध्यमाची शाळा मो. ह. विदयालय, ठाणे या शाळेस
- नेने ढाल,प्रदान करण्यात आली. (इ.१०वी एकूण निकाल ९७.६६% )
प्रमुख पाहुण्या सौ. सायली महाजन पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना आपल्या यशाचे आणि प्रगतीचे श्रेय शाळेतील शिक्षक आणि संस्था पदाधिकारी यांना दिले. तसेच त्यांच्याप्रती ऋण व्यक्त केले. नुकत्याच १० वी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे आणि प्रगती करावे, तसेच मनाची मशागत करण्यासाठी एखादी कला आत्मसात करावी असा मोलाचा सल्ला दिला.
आजचा दिवस कै. अक्षीकर यांना आठवण्याचा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. अक्षीकरांच्या डोळ्यातून संस्थेची आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची स्वप्न पाहू या असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास कोल्हटकर उपस्थित होते. डॉ.कोल्हटकर यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमात डिझिटायलेशनचा उपयोग स्वागतार्ह आहे असे सांगितले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी श्री. तामरस सर, राका सर व संस्थेचे सन्मानीय संचालक मंडळ सदस्य,मुख्याध्यापक,निमंत्रित ,हितचिंतक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह विकास पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार संचालक मंडळ सदस्या सौ. स्नेहा शेडगे यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अर्चना ईशी व देवेंद्र पाटील यांनी केले.

Post a Comment