अवयवदान – जीवन संजीवनी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात ४९०० जणांची नोंदणी
(जिल्हा परिषद, ठाणे) – राज्य सरकारतर्फे ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या "अवयवदान – जीवन संजीवनी अभियान" मध्ये ठाणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ४ हजार ९०० नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा नोंदविली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या देखरेखीखाली सर्व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांमार्फत जनजागृती करण्यात आली.
अवयवदानाचे महत्त्व स्पष्ट करताना डॉ. गंगाधर परगे म्हणाले, "अवयवदान ही मानवतेची सर्वोच्च देणगी आहे. मृत्यूनंतर देखील आपल्या अवयवांद्वारे इतरांना नवे जीवन देता येते. एका अवयवदात्यामुळे ८ रुग्णांचे प्राण वाचू शकतात."
आरोग्य विभागाने नागरिकांना अवयवदानासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ केली असून, QR कोड स्कॅन करून किंवा notto.abdm.gov.in संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक किंवा आभा संलग्न मोबाइलद्वारे नोंदणी करता येते. प्रतिज्ञा पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्रही डाउनलोड करता येते.
आरोग्य विभाग, ठाणे यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, "अवयवदान करा, जीवनदान द्या – मृत्यूपलीकडे जगा. आपण घेतलेला हा छोटासा निर्णय इतरांसाठी आयुष्याचा अमूल्य ठेवा ठरू शकतो."

Post a Comment