दापूर माळ विकासकामांना प्रारंभ; रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकामाला गती
ठाणे– शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनूप अंतर्गत असलेल्या दापूर माळ या अतिदुर्गम भागात विकासासाठी तयार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्व प्रमुख विकासकामांना प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात येणार आहे.
२३ जुलै, २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेतलेल्या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात ग्रामस्थांच्या समस्या ऐकून तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर तातडीने घेतलेल्या बैठकीत रस्ते, घरकुल, पाणीपुरवठा व शाळा बांधकाम या सर्व कामांसाठी सविस्तर कृती आराखडा मंजूर करण्यात आला.
सुरू होणारी प्रमुख कामे:
• रस्ते: वनविभागाच्या सहकार्याने दापूर माळपर्यंत सुमारे ५ किमी रस्ता उभारणी.
• घरकुल: एकूण ३३ मंजूर घरकुलांसाठी बांधकाम साहित्याची वाहतूक सुरू, CSR निधीमधून विशेष सहाय्य.
• पाणीपुरवठा: अजनूप गावातून दोन टप्प्यांत लिफ्टिंगद्वारे पाणीपुरवठा योजना अंमलबजावणीला प्रारंभ.
• शाळा व अंगणवाडी बांधकाम: साहित्य वाहतूक पूर्ण करून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीच्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले, " दापूर माळ दौऱ्या दरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांचे निरासारण लवकरच करण्यात येणार आहे. वन विभागाशी चर्चा करून त्याची मंजुरी घेण्यात आली आहे. त्यानुसार रस्त्याच्या कामाला स्वातंत्र्य दिनी सुरुवात होणार असून शाळा, पाणी व्यवस्था आणि घरकुलांची कामे देखील हाती घेण्यात आली आहे. तसेच शासनाच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणार आहे. तसेच सर्व योजना सर्व सुविधा लवकरात लवकर पुरविण्याबाबत कटीबद्ध आहोत."
या कामांच्या सुरुवातीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काही महिन्यांत दापूर माळ हा भाग सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment