अतिवृष्टीदरम्यान ठाणे महापालिका प्रशासन सज्ज


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नौपाडा चिखलवाडी येथे पाहणी

ठाणे : गेल्या दोन ‍दिवसापासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामानखात्याने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीदरम्यान नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिल्या. सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत चिखलवाडी, भांजेवाडी या परिसराची पाहणी करुन  या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दरम्यान आयुक्‌त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी,  अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते.

दिनांक 17 ऑगस्ट रोजी ठाणे शहरात 223.43 मि.मी इतका पाऊस झाला. तर मंगळवार सकाळपासून दुपारी 1.30 वाजेपर्यत एकूण 67.55मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे ठाणे महापालिकेची यंत्रणा ही 24 तास काम करत असून आपत्कालीन कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. ज्या ज्याठिकाणी सखल भागात पाणी साचत आहेत, त्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा निचरा केला जात आहे. तसेच  अतिरिक्त मनुष्यबळ देखील पुरविण्यात आले आहे. संध्याकाळी मोठी भरती असून या काळात देखील मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेवून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आल्यास त्यासाठी महापालिकेच्या वास्तू तसेच शाळा याठिकाणी सोय उपलब्ध करण्यात आली असल्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.

ठाणे शहरातील पातलीपाडा येथील श्री माँ शाळेची संरक्षण  भिंत तसेच मुंब्रा येथील नाशिक वॉर्ड  चाळीतील घराची  भिंत व ओझोन व्हॅली येथील नाल्याची संरक्षण भिंत नाल्यामध्ये पडल्याच्या घटना घडल्या असून कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. त्याचप्रमाणे लोकमान्य पाडा क्र. 4 येथे डोंगरावरची माती खाली आल्याने एका व्यक्तीस दुखापत झाली असून त्याला उपचारार्थ छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठविण्यात आले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी  सांगितले.

आयुक्तांनी घेतला आपत्कालीन कक्षाचा आढावा

ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात आयुक्त सौरभ राव यांनी भेट देवून आढावा घेतला. आपत्कालीन कक्षात मदतीचा कॉल आल्यास तात्काळ त्या ‍ठिकाणी मदत पोहचेल या दृष्टीने संबंधित विभागाला माहिती द्यावी अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी  घाबरुन न जाता महापालिकेच्या आपत्कालीन  कक्ष वा स्थानिक प्रभाग समितीशी संपर्क साधवा तसेच महापालिकेने वेळोवळी दिलेल्या सूचनांची पालन करावे असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.


ठाणे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाची पाहणी करून कामाचा आढावा घेताना महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत