ज्येष्ठ गायिका लीलाताई शेलार यांचे निधन
ठाणे ः ज्येष्ठ गायिका लीलाताई शेलार यांचे सोमवारी सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात भाऊ व त्यांची मुले असा परिवार आहे. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरू लीलाताई शेलार अशीच त्यांची ओळख ठाण्यात होती. त्यांनी हयातभर गायन कलेची सेवा केली. आता पन्नास आणि साठीत असलेल्या ठाण्यातील सर्व गायकांनी लीलाताईकडे गाण्याचे धडे गिरवले आहेत. ठाण्यात गाणं शिकू इच्छिणार्या प्रत्येकासाठी शेलारबाईंची गाण्याच्या शिकवणीकडे आपसूक पावले वळत, असा त्यांच्या वर्गाचा नावलौकिक होता.
लीलाताईंनी गाण्याचे शिक्षण पं. अच्युत अभ्यंकर यांच्याकडे घेतले. सुमारे 50 ते 60 दशके त्यांनी ठाण्यात गाण्याचे वर्ग चालवले. ज्येष्ठ गझल गायक अनिरूध्द जोशी, पं. सुरेश बापट आणि वरदा गोडबोले यांच्यासारखे अनेक शिष्य त्यांनी घडवले.
लीलाताई सुगम संगीताच्या मैफली करत असते. याशिवाय घंटाळी मित्रमंडळाचे दिवंगत योगगुरू श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या समवेत त्यांनी रोग मनाचा - शोध मनाचा या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. त्यांचा योगाभ्यास दांडगा होता. ठाणे महापालिकेने ठाणे गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते. गोखले रोडवरील शेलार वाडीतील निवासस्थानी मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
Post a Comment