हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्या विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन


पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांनी हिंदूंची माफी मागावी

मुंबईतील काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हजारो शिवसैनिकांचा ठिय्या
  

मुंबई, 

हिंदू दहशतवाद, सनातन दहशतवाद अशी वक्तव्यं करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबई आणि ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयावर शिवसैनिकांनी आणि महिला आघाडीने पृथ्वीराज चव्हाण, राहुल गांधी यांनी हिंदूंची माफी मागावी, या मागणीसाठी ठिय्या केला. या आंदोलनात आमदार मनीषा कायंदे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, सचिव संजय मोरे, माजी खासदार राहुल शेवाळे, शायना एन.सी, समाधान सरवणकर यांच्यासह महिला आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्या आणि हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते.


मालेगाव बॉम्बस्फोटात एनआयए कोर्टाने सर्व सात हिंदूंना निर्दोष मुक्त केल्यानंतर हिंदू दहशतवाद बोलणाऱ्या काँग्रेसला जबरदस्त चपराक बसली आहे, मात्र तरिही पृथ्वीराज चव्हाणसारखे नेते सनातन दहशतवाद, हिंदू दहशतवाद अशी वक्तव्य करुन हिंदूंना बदनाम करत आहे, त्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणा देऊन निषेध केला. काँग्रेसची विचारधारा ही तुष्टीकरणाची आहे. हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद, असे शब्द वापरुन काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, दिग्वीजय सिंग, पी. चिदंबरम आणि राहुल गांधी यांनी हिंदूंना बदनाम करण्याचे काम केले. मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित स्वाध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिचा काँग्रेस सरकारने १७ वर्ष छळ केला. मात्र एनआयए कोर्टाने सर्व आरोपांची निर्दोष सुटका केली, यामुळे काँग्रेस नेत्यांचा तिळपापड झाला. काँग्रेस नेते पाकिस्तानचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत, अशी घणाघाती टीका आमदार कायंदे यांनी यावेळी केली. 


हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन धर्माचा अपमान केला आहे. यामुळे हिंदू समाजात संतापाची लाट असून चव्हाण यांनी हिंदूंची माफी मागावी, असे माजी खासदार राहुल शेवाळी यांनी यावेळी सांगितले. दहशतवादाला रंग नसतो, धर्म नसतो असे सांगणारे काँग्रेसवाले आता सनातन आतंकवाद का म्हणत आहेत. या काँग्रेसवाल्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले हिंदू म्हणवणारे उबाठा का आता मूग गिळून गप्प का, असा सवाल शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप भारतीयांची हत्या केली, आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदू दहशतवाद, सनातन आतंकवाद बोलून जो करंटेपणा दाखवला त्याचा शिवसेना तीव्र शब्दांत निषेध करते, असा संताप म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला. सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.     

ठाण्यात युवा सेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी


हिंदू धर्माचा आणि भगव्या झेंड्याचा अवमान करणाऱ्या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा युवा सेनेकडून ठाण्यात युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध करण्यात आला. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

---–---------------------------------------------------------------------


 

</

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत