उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यमंत्री योगेश कदम यांना ठाम पाठबळ
खेडमध्ये स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचा भव्य लोकार्पण सोहळा
खेड, रत्नागिरी : खेड नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा आज उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला.
हा सोहळा शिवसेना नेते व माजी मंत्री मा. श्री. रामदासभाई कदम यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात आला होता. जनतेच्या सेवेत कायम राहिलेल्या या कुटुंबाच्या सामाजिक-राजकीय योगदानाचा भाग म्हणून, या अद्ययावत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन या विशेष दिवशी झाल्यामुळे कार्यक्रमास अधिकच महत्त्व प्राप्त झाले.
राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात म्हणाले, १५ वर्षे बंद असलेल्या या नाट्यगृहासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकाराने तब्बल १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे हे नाट्यगृह मुंबईतील कोणत्याही रंगमंचाला टक्कर देईल अशा भव्य स्वरूपात उभे राहिले आहे. ग्रामीण भागात असे अद्ययावत नाट्यगृह उभे राहणे ही लोकांसाठी आणि कलाकारांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
या कार्यक्रमाच्या भावनिक पैलूवर बोलताना राज्यमंत्री कदम म्हणाले
माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि माझ्या नेत्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मी कधीही चुकीचं काम केलं नाही आणि भविष्यातही करणार नाही. रामदासभाईंच्या तीन दशकांहून अधिक कारकिर्दीत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. त्यांच्या पवलांवर पाऊल ठेवून मी ठामपणे सांगतो की, माझ्या हातून एकही काळं काम झालेलं नाही आणि होणारही नाही.
माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी आपल्या भाषणात भावनिक भाष्य करत म्हटलं मुंबईतील नाट्यगृहालाही लाजवेल इतकं छान नाट्यगृह बनवणारा माझा मुलगा योगेश दादा… कभी कभी बाप से भी बेटा सवाई होता है.
आमच्या उभ्या आयुष्यात डाग लावून घेतला नाही. डान्स बार चालवणारी आमची अवलाद नाही. आम्ही लोकांचे संसार उध्वस्त करत नाही, उभे करतो.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यमंत्री कदम यांची ठाम पाठराखण करत ठाम शब्दांत सांगितले,“शिवसेनेच्या वाटचालीचं प्रतीक म्हणजे हे नाट्यगृह. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेब यांचा वारसा या माध्यमातून जपला जातो आहे.” योगेश कदम यांनी चिंता करण्याची गरज नाही. संपूर्ण शिवसेना, आणि मी स्वतः, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे. टीका करून काम थांबत नाही. राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. जे स्वतः दरोडेखोर आहेत, ते इतरांना चोर म्हणत आहेत…हे कसं चालेल?
आपल्या कामाचा फोकस विकासावर आहे, आणि आपण त्यावरच भर दिला पाहिजे. “आरोपांच्या कोणी करो कुरापती… योगेश आणि सिद्धेशच्या जोडीने
रामदासभाई कदम करतील त्यांची माती…”
उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनीही आपल्या भाषणात राज्यमंत्री योगेश कदम यांचे कौतुक केले. सध्या सर्वात चांगली युवा पिढी योगेश कदम यांच्या मागे आहे. ते विकास, शिस्त आणि जनतेशी नाळ जपणारे खरे जनतेचे नेतृत्व आहेत.
या भव्य लोकार्पण सोहळ्यास मा. ना. श्री. एकनाथजी संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य; मा. ना. डॉ. उदयजी रविंद्र सामंत, मंत्री, उद्योग व मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा; मा. ना. श्री. भरतशेठ मारुती गोगावले, मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास, महाराष्ट्र राज्य; मा. श्री. रामदास लिलाबाई कदम, माजी मंत्री व माजी विरोधी पक्षनेते; मा. ना. श्री. योगेशजी रामदास कदम, राज्यमंत्री, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, तसेच नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य; मा. श्री. अशोकजी पाटील, आमदार; मा. श्री. संजय कदम, माजी आमदार; श्री. शशिकांतजी चव्हाण, जिल्हाप्रमुख, शिवसेना, रत्नागिरी जिल्हा; तसेच श्री. महादेव बी. रोडगे, जिल्हाधिकारी, रत्नागिरी जिल्हा आणि प्रशासक तथा मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद, हे मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते.

Post a Comment