निसरड्या पदपथांमुळे होत आहेत अपघात ,प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
स्वच्छतेसाठी काँग्रेस पुढे सरसावली
ठाणे. (प्रतिनिधी):कोकणी पाडा येथील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर चौक येथील पदपथ,सायकल ट्रॅक पावसामुळे निसरडे झालेले आहेत तर ठीक ठिकाणी कचरा देखील साचला आहे त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. सकाळ-संध्याकाळी येथे चालण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.परंतु येथील पदपथावर सध्या शेवाळ साचल्याने पादचाऱ्यांचा पाय घसरून तसेच सायकल ट्रॅक वरून देखील घसरून पडण्याच्या घटना होत आहेत. याचा सर्वाधिक धोका मॉर्निंग वॉक साठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना असून त्यांना निसरड्या पदपथावरून चालताना कसरत करावी लागत असले बाबतच्या अनेक तक्रारी ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना प्राप्त होत होत्या .याची तातडीने दखल घेत ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण,प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेत ब्लिचिंग पावडर टाकून, हातात झाडू घेत येथील पदपथ स्वच्छ केला
यावेळी बोलताना ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले की आमच्या देखत तीन ते चार जण या ठिकाणी घसरले त्यामुळे बदलते ठाणे या शीर्षकाखाली प्रशासन स्वच्छता मोहीम राबवत साफसफाई करत असल्याच्या बाता मारते परंतु इथे मात्र साफसफाई नसल्याने पदपथावरून,सायकल ट्रॅक वरून घसरून अपघात होत असल्याने नुसत्या पोकळ घोषणा करण्यापेक्षा किमान या पदपथांची स्वच्छता तरी योग्य रीतीने करावी तसेच निवडणूक काळात दारोदारी जाऊन मतांचा जोगवा मागणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आता मात्र नागरिकांना त्रास होत असताना झोपी गेल्याचे दिसत आहे. परंतु काँग्रेस मात्र जनतेसाठी रस्त्यावर आहे. .यावेळी ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी सांगितले की एका आठवड्याच्या आत झाडांची छाटणी, पदपथावरील अनावश्यक घाण, गवत काढून टाकणे , जॉगिंग ट्रॅक,सायकल ट्रॅक, ब्लिचिंग पावडर टाकून जेट मशीनने साफसफाई करून सुस्थितीत न आणल्यास पालिकेच्या आधिकाऱ्यांसाठी निसरड्या पदपथांवर चालण्याची स्पर्धा आयोजित करण्यात येऊन त्या बाबतचे निमंत्रणाचे पत्र त्यांना देण्यात येईल तसेच या पदपथावर न घसरता, न पडता चालून दाखवण्याऱ्या अधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षातर्फे बक्षीसही देण्यात येईल.या प्रसंगी ठाणे काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment