मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवस, सण उत्सव साजरे करावेत; आम्हाला लटकवून टाकावे


ठाणे - ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केली आहेत. मात्र, त्यांना अद्याप त्यांची देयके दिली नाहीत. ही देयके तत्काळ अदा करावित, या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 


राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात. मात्र, त्यांची सुमारे 90 हजार कोटी रूपयांची देयके रखडली आहेत. ही देयके अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे. आता या देयकांमध्ये जल जीवन मिशनच्या देयकांचाही समावेश झाला आहे. ही देयके तत्काळ देण्यात यावीत, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध केला. तसेच, हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्हीही आत्महत्या करायच्या का? असा सवाल उपस्थित केला. 


या प्रसंगी मंगेश आवळे म्हणाले की,   आमचे पैसे मिळविण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करीत आहोत. तरीही आमची 90 हजार कोटी रूपयांची देयके अदा करण्यात आलेली नाहीत. आता ठाणे जिल्ह्यात जलजीवन योजनेंतर्गत 740 कामे करण्यात आली. 740 गावांतील घराघरात कंत्राटदारांनी पाणी पोहचविले आहे. ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबविण्यात येत आहे. आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केले आहेत. तर राज्य सरकार काहीही भाष्य करायला तयार नाही. एकीकडे सरकारी बाबू धोरणे बदलत आहेत आणि दंडही ठेकेदारांनाच लावत आहे. आम्ही अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वाढदिवस साजरे करीत आहेत. त्यांनी आनंदाने दिवस साजरे करावेत, दिवाळी करावी. पण, आम्हाला काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे त्याचे काय? आम्हीही लटकून घ्यावे का, असा सवाल केला. 


या आंदोलनात कल्पेश केणी  भगवान भोईर पिन पाटील  आकाश आव्हाड  अनंता पवार  अनिकेत अनिकेत ढालपे कौस्तुभ राणे काशिनाथ मुरबाडे विक्रांत देशमुख  राणा ढोले अनिल नलावडे  चेतन शिंदे  अविनाश तिवरेकर आदी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत