ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विशेष पथकांची ३० अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
• एमआरटीपी अंतर्गत एक गुन्हा दाखल
• इमारत, कॉलम, वाढीव बांधकाम याप्रकारच्या बांधकामांवर झाली कारवाई
• नऊ प्रभाग समिती क्षेत्रात उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात कारवाईसाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती
ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण, पाडकाम या कारवाईसाठी उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी केलेल्या कारवाईत एकूण ३० अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली. तसेच, लोकमान्य नगर-सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामप्रकरणी एमआरटीपीअंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला.
मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर, प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समितीनिहाय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसेच सह पथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत, सहाय्यक पथक प्रमुख, अभियांत्रिकी अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे.
या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अव्याप्त इमारती, बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत. तसेच, काही ठिकाणी वाढीव बांधकाम, कॉलम उभारणी, प्लिंथचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आली आहे. विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली.
येऊर, मुंब्रा, दिवा, वागळे इस्टेट, नौपाडा, उथळसर, माजिवडा-मानपाडा येथे ही कारवाई करण्यात आली. दिवा येथील १७ इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या. तेथे एकूण पाडण्यात आलेल्या इमारतींची संख्या १३ झाली आहे. तेथे पाडकामास विरोध झाला. अखेर पोलिस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे पाटोळे यांनी सांगितले. दिवा येथील कारवाईच्यावेळी उपायुक्त मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदी उपस्थित होते.
यापूर्वी, या मोहिमेत ३३ बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात आणखी ३० बांधकामांची भर पडली आहे. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता
• नौपाडा-कोपरी - ०३
• दिवा - ०८
• मुंब्रा - ०३
• कळवा - ०१
• उथळसर - ०२
• माजिवडा-मानपाडा - ०७
• वर्तक नगर - ०२
• लोकमान्य नगर - ०२
• वागळे इस्टेट - ०२
• एकूण - ३०
Post a Comment