कावेसर तलाव सुशोभिकरणाविरोधात पुन्हा एकदा रहिवाशांचा एल्गार!


भर पावसात `कावेसर वाचवा' घोषणा देत काढली जनजागृती रॅली

ठाणे,  (प्रतिनिधी) : हिरानंदानी इस्टेट परिसरातील निसर्गरम्य कावेसर तलावाच्या कॉंक्रिटीकरणासह सुशोभिकरणाला रहिवाशांचा वाढता विरोध असून, आज मुसळधार पावसात रहिवाशांनी पुन्हा एकदा एल्गार केला. यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी केलेल्या निदर्शनानंतर आज `कावेसर तलाव वाचवा' घोषणा देत मोठ्या संख्येने रहिवाशांनी एकत्र येत जनजागृती करण्यासाठी रॅली काढली. त्यात शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. महापालिकेने सुशोभिकरणाचा निर्णय रद्द करेपर्यंत ही कॉंक्रिटीकरणाविरोधातील लढाई सुरूच राहील, असा इशारा देतानाच हा परिसर सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा, अशी मागणी रॅलीतून करण्यात आली.


ठाणे महापालिकेने स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता कावेसर तलावाच्या सुशोभिकरणाचा निर्णय रहिवाशांवर लादला आहे. त्याविरोधात स्थानिक रहिवाशी संघटीत होत आहेत. हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा येथील रहिवाशांनी समाजमाध्यमातून एकत्र येत `सेव्ह कावेसर लेक सिटीझन्स मुव्हमेंट' ही चळवळ उभारली आहे. यापूर्वी जागतिक पर्यावरण दिनी कावेसर तलावाच्या काठावर निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन याचिका तयार करून त्यावर हजारो नागरिकांनी स्वाक्षरी करून सुशोभिकरणाला विरोध दर्शविला आहे. आज पुन्हा रहिवाशी एकत्र आले. त्यांनी पातलीपाडा येथील ऋतू सर्कलहून कावेसर तलावापर्यंत मोर्चा काढला. कावेसर तलाव वाचवा अशा घोषणा रहिवाशांनी दिल्या

कावेसर तलाव हा निसर्गरम्य परिसर आहे. या परिसरात पक्षी असून, शांतता आहे. तर बाजूच्याच कॉंक्रिटच्या जंगलात गजबजाट आहे. त्यामुळे पुढील पिढीला निसर्ग पाहण्यासाठी तरी कावेसर तलाव हा नैसर्गिक पद्धतीनेच कायम ठेवावा. कावेसर तलावाचा परिसर हा सायलेंट झोन म्हणून जाहीर करावा. हिरानंदानी इस्टेट परिसरात अनेक कृत्रिम बगिचे आहेत. कावेसर तलावाचा परिसर हे एकमेव नैसर्गिक ठिकाण राहिले आहे, ते वाचवावे, असा आग्रह रहिवाशांनी धरला. एका ज्येष्ठ नागरिक महिलेने आम्हाला कॉंक्रिट रस्त्याऐवजी मातीतून चालणे आवडते. त्यामुळे कॉंक्रिट मार्गाचा आग्रह धरू नये.निसर्गाप्रमाणेच तलावांची जोपासना करावी, अशी प्रतिक्रिया नोंदवून सुशोभिकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली.


`निसर्गरम्य परिसराचे सुशोभिकरण

     हा मानवाचा अहंकार'

निसर्गसंपन्न परिसराचे सुशोभिकरण हा मानवाचा अहंकार आहे. सुशोभिकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण केले जात असून, ठाणे शहरात अनेक समस्या आहेत. वाहतूककोंडी, कचरा, निकृष्ट रस्ते आदी प्रश्नांवर खर्च करण्याऐवजी कॉंक्रीटीकरणावर खर्च केला जात आहे, अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने व्यक्त केली.


-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत