सर्व चिकित्सा पद्धतींचे शिक्षण राज्यात उपलब्ध करून देण्यासाठी 'महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा'चे महत्त्वपूर्ण योगदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे 'उत्कृष्टता केंद्रा'चे भूमिपूजन तसेच 'चक्र' (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी)चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसला भेट देण्याची संधी मिळाली. अशा प्रकारच्या कॅम्पससाठी केवळ निधी नव्हे तर दूरदृष्टी आवश्यक असते आणि ती दूरदृष्टी येथे पाहायला मिळाली.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला 25 वर्ष पूर्ण झाली असून सर्व चिकित्सा पद्धतींचे शिक्षण राज्यात उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विद्यापीठ केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजनापुरते मर्यादित राहिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. जगातील आघाडीची विद्यापीठे ही 'सेंटर ऑफ एक्सलन्स' आणि 'सेंटर ऑफ इन्क्युबेशन' म्हणून कार्यरत आहेत. तेथे व्यापक प्रमाणावर संशोधन होते, नवउद्योजक तयार होतात आणि संबंधित क्षेत्रांमध्ये दिशादर्शक भूमिका ही विद्यापीठे बजावतात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी शिक्षण नीती लागू केल्यानंतर शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टीकोनात सकारात्मक बदल झाला आहे. मला आनंद आहे की आज आपल्या विद्यापीठांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. पूर्वी शिक्षण व्यवस्थेत आणि जॉब मार्केटमधील गरजांमध्ये तफावत होती. मात्र, आता विद्यापीठे उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रम तयार करत आहेत. या पार्श्वभूमीवर, 'हब अँड स्पोक' पद्धतीवर आधारित तयार करण्यात आलेले चक्र मॉडेल आणि 'सेंटर ऑफ एक्सलन्स' ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
मागील काळात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नागपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत ट्रायबल हेल्थ या विषयावर एक उपयुक्त कार्यक्रम राबवला होता. अशा नव्या आणि महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्य करणे आवश्यक आहे. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्यात आले असून, त्यात ट्रायबल हेल्थ, जेनेटिक केअर आणि जेनेटिक स्टडी यांचा समावेश करण्यात आला आहे. जगभरातील विद्यापीठे स्वयंपूर्ण होत असून, ती सरकारवर अवलंबून राहत नाहीत. भविष्यात भारतातही अशीच परिस्थिती निर्माण होईल. यासाठी अशा प्रकारचे प्रयोग अत्यंत महत्वाचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
महाराष्ट्रातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यातील 13 कोटी जनतेसाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत प्रति कुटुंब ₹5 लाखपर्यंतचे आरोग्यविमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत होणाऱ्या 50% शस्त्रक्रिया व उपचार आपल्याच आरोग्य संस्थांमध्ये व्हावेत, यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment