मोघरपाडा ते नागलाबंदर नाल्याची तब्बल 15 वर्ष साफसफाई नाही


 नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयाच्या दारात टाकण्याचा मनसेचा इशारा



ठाणे - घोडबंदर रोडवरील ओवळा, कासारवडवली या परिसरात झपाट्याने मोठमोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. या गृहसंकुलांतील सांडपाणी मोघरपाडा गाव ते नागलाबंदर खाडीपर्यंत विस्तिर्ण असलेल्या नाल्यात सोडले जात आहे. गेल्या 15 वर्षात या नाल्याची साफसफाईच झाली नसल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घोडबंदर रोड विभाग अध्यक्ष किरण रामकृष्ण पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत सफाई न झाल्यास नाल्यातील गाळ पालिका मुख्यालयाच्या दारात टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


घोडबंदर रोडवरील ओवळा, कासारवडवली हा परिसर झपाट्याने विकसित होत असुन उंच उंच टॉवर उभारले जात आहेत. सर्व गृहसंकुलांचे सांडपाणी मोघरपाडा गाव ते नागलाबंदर पर्यंत विस्तारलेल्या नाल्यामध्ये सोडले जात आहे. हा नाला मोघरपाडा गावापासून मौजे मोघरपाडा सर्व्हे नंबर 30 मधुन पुढे नागलाबंदर खाडीपर्यंत जातो. मोघरपाडा गाव ते नागलाबंदर ही पुर्वीपासुन एक छोटी खाडी होती व पुर्वी या खाडीचे पाणी शुद्ध होते आणि मोघरपाडा व इतर गावांतील स्थानिक गावकरी मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु जसा जसा परिसरात गृहसंकुले उभारली जाऊ लागली तशी या खाडीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याची माहिती किरण रामकृष्ण पाटील यांनी ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदानात दिली आहे. 


15 वर्ष झाली तरी या नाल्याची अद्याप सफाई झालेली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पण विकासकांच्या फायद्यासाठी या गोष्टीकडे कानाडोळा केला. पावसाळ्यात दरवर्षी नाल्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन मौजे मोघरपाडा सर्व्हे नंबर 30 व इतर सर्व्हे नंबर मधील शेतांमध्ये जाऊन शेतीचे आतोनात नुकसान होत आहे. नाल्यातील गाळ काढुन सफाई केली नाही तर पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊ शकते व नागरीकांचे आरोग्य सुद्धा धोक्यात येऊ शकते. येत्या 15 दिवसात गाळ साफ करण्याचे काम न झाल्यास सदरचा गाळ डंपरमध्ये टाकून ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर टाकण्यात येईल व तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण रामकृष्ण पाटील यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत