'खजिन्याची शोधयात्रा’ - केवळ पुस्तक नव्हे, तर इतिहासाच्या मुळाशी जाण्याचा आणि भारतीय अस्मितेला नवसंजीवनी देणारा प्रवास!

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे प्रशांत पोळ लिखित वेदांपासून न्यायशास्त्रापर्यंत, प्राकृतिक शेतीपासून बायनरी प्रणालीपर्यंत — भारतीय बौद्धिक संपदेचे दर्शन घडवणारी एक साहित्यिक प्रस्तुती असलेल्या ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.

या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि इतिहासाचा अफाट खजिना पुन्हा एकदा प्रकाशझोतात येणार आहे. वेदांपासून न्यायशास्त्रापर्यंत, प्राकृतिक शेतीपासून बायनरी कोडपर्यंत... एका शोधयात्रेतून भारताची बुद्धिमत्ता, परंपरा आणि प्राचीन ज्ञानविश्व साकारणारा हा ग्रंथ म्हणजे भारतीय बौद्धिक परंपरेचे दार उघडणारी एक खास साहित्यिक मोहीम आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रशांत पोळ यांनी अत्यंत सूक्ष्म अभ्यास आणि संशोधनातून भारताचा खऱ्या अर्थाने गौरवशाली इतिहास समोर आणला आहे. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाच्या खजिन्याची पारायणे आहे. शासनामार्फत हा ठेवा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील.”

आर्य आक्रमणाच्या जुनाट सिद्धांतांपासून पुढे जात, आता विविध संशोधक हेच सांगत आहेत की भारतच जगातील अनेक संस्कृतींचे उगमस्थान होता. धोलाविरा, लोथल यांसारख्या प्राचीन नगरांची माहिती, वेदांतील सरस्वती नदीचे उपग्रहांद्वारे सापडलेले पुरावे, 6000 वर्षांपूर्वीचे स्थापत्यशास्त्र, आणि वैदिक गणित यांचा अंतर्भाव या पुस्तकात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जेव्हा युरोपात संस्कृती ही संकल्पनाही अस्तित्वात नव्हती, तेव्हा भारताची संस्कृती विकसित आणि समृद्ध होती. आज ‘खजिन्याची शोधयात्रा’ हे पुस्तक आपल्याला आपल्या मूळांचा शोध घ्यायला भाग पाडते. आपल्या प्राचीन ज्ञानसंपदेचा अभिमान वाटायला लावते.”

धर्मनिरपेक्षतेच्या नावावर पारंपरिक प्रथा, स्मृती आणि विचारांची जी धूळधाण केली गेली, ती विसरून आपला खरा इतिहास, आपली संस्कृती नव्याने समजून घेण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. आयुर्वेद, स्मृती, स्थापत्यशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त केली आणि प्रशांत पोळ यांच्या या शोधयात्रेला शुभेच्छा दिल्या.


प्रकाशनप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, मध्यप्रदेशचे मंत्री राकेश सिंह, डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत