जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न

 

     ठाणे,(जिमाका):-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले.

     यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, प्र. उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) सचिन चौधर, तहसिलदार (महसूल) रेवण लेंभे, तहसिलदार उमेश पाटील, प्रदीप कुडाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

      राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ सुरू करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार या कक्षाचे आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री / मंत्री/ राज्यमंत्री यांच्या हस्ते संपूर्ण राज्यात उद्घाटन करण्यात आले. या कक्षाचे प्रमुख म्हणून रामेश्वर नाईक हे जबाबदारी सांभाळीत आहेत.

     राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची 23 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणेबाबत निर्देश दिले होते. 

     वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी, याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत