ठाणे महानगरपालिकेच्या ३८ उपशिक्षक आणि ५३ वरिष्ठ लिपिक यांना मिळाली पदोन्नती


• उपशिक्षकांना मुख्याध्यापक तसेच, वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर पदोन्नती
• महापालिका कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण*
• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे कर्मचारी आणि शिक्षकांनी मानले आभार


           ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मान्यतेने बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील ३८ उपशिक्षक (प्राथमिक विभाग, मराठी माध्यम) आणि ५३ वरिष्ठ लिपिकांची पदोन्नती करण्यात आली. प्राथमिक विभागातील (मराठी माध्यम) ३८ उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर, ५३ वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.


        ठाणे महानगरपालिकेच्या ३८ उपशिक्षक आणि ५३ वरिष्ठ लिपिकांची पदोन्नतीचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी काढले. त्यापूर्वी, मंगळवारी, वरिष्ठ लिपिक या पदावर ४६ जणांना, अग्निशमन प्रणेता (लिडिंग फायरमन) या पदावर १९ जणांना, तर सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर ०२ जणांना पदोन्नती देण्यात आली. आतापर्यंत एकूण १५८ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीच्या या निर्णयांमुळे महापालिका कर्मचारी, शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आभार मानले आहेत.


           आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी- कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती. महापालिकेच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असून रिक्त पदांवरील पदोन्नती तातडीने होऊन नागरीकांना सुविधा देण्याचे कामकाज प्रभावीपणे व्हावे व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास सूचना केली होती. त्यानुसार, वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधिक्षक पदावर शासकीय निकषांनुसार तीन वर्षांच्या विहित मुदतीत पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीबाबतचे हे सूत्र राबविण्यात आल्याने ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचा त्यांच्या कामकाजावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

         त्याचप्रमाणे, या संदर्भात, काही पदोन्नत्तींबाबत शासनाकडून सुस्पष्ट आदेश प्राप्त झाले. त्यामुळे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्या पदोन्नत्ती करणायासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार, मंगळवारी एकूण ६७ कर्मचारी आणि बुधवारी एकूण ९१ कर्मचारी यांच्या पदोन्नती करण्यात आल्या आहेत. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना लवकरच होणार, असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत