यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५' अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव


'


 (जिल्हा परिषद, ठाणे) - ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना  २७ मे, २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले.


          या कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचायत राज संस्थांना आणि गुणवंत अधिकारी/कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


           या वेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे व इतर मान्यवर उपस्थित होते.


          या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, वर्धा (तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या कार्यकाळातील कामगिरीसाठी) यांना "यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2022-23" अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (₹३० लाख रक्कमेसह) प्रदान करण्यात आले.


ठाणे जिल्हा परिषदेचे गुणवंत अधिकारी व आदर्श संस्था (राज्यस्तरीय):

गुणवंत अधिकारी / कर्मचारी – सन 2022-23

1. अविनाश फडतरे – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)

2. संगीता रामकृष्ण घुरडे – सहायक लेखा अधिकारी, अर्थ विभाग


आदर्श ग्रामपंचायत अधिकारी – 2022-23

विलास कृष्णा मिरकुटे, ग्रामपंचायत अधिकारी, मासले, ता. मुरबाड


गुणवंत अधिकारी – 2023-24

अजय वामन भोंडीवले, सहायक प्रशासन अधिकारी, पंचायत समिती, शहापूर


आदर्श ग्रामपंचायत अधिकारी – 2023-24

विशाखा विवेक पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, वाशिंद, ता. शहापूर


अत्युत्कृष्ट विभागस्तर पंचायत समिती पुरस्कार – पंचायत समिती, शहापूर (2023-24)

गट विकास अधिकारी नम्रता जगताप व तत्कालीन गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे


             मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या गौरवप्रसंगी भावना व्यक्त करताना सांगितले की, "यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान अंतर्गत मिळालेला हा गौरव म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही, तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्याच्या समर्पित सेवाभावाची पावती आहे. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायती यांचा समन्वय अत्यावश्यक आहे. ठाणे जिल्ह्यात आम्ही ‘सशक्त पंचायत – सक्षम ग्रामविकास’ या तत्वावर काम करत असून, हा पुरस्कार आमच्या कार्यपद्धतीला मिळालेली मान्यता आहे."


            या उल्लेखनीय यशामुळे ठाणे जिल्हा परिषदेचे नाव राज्यस्तरावर गौरवाने घेतले जात आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, तसेच सर्वच स्तरातून पुरस्कारप्राप्त अधिकारी आणि विभागांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हा सन्मान आगामी काळात कार्यक्षमता, पारदर्शकता आणि ग्रामविकासासाठी अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत