पावसाळापूर्व कामांचा नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी घेतला विभागनिहाय आढावा

 


            मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होण्याचे अनुमान हवामान विभागाने व्यक्त केले असून त्या अनुषंगाने पावसाळापूर्वीच्या सुरु असलेल्या कामांना गती द्यावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व विभागांच्या पावसाळापूर्व कामांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त, कार्यकारी अभियंता आणि संबधित अधिकारी उपस्थित होते.

            सदर आढावा बैठकीत मान्सुनपूर्व कामांची विभागनिहाय सद्यस्थिती आयुक्तांनी जाणून घेतली. मुख्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरु असून या ठिकाणी 1800222309 आणि 1800222310 हे दोन टोल फ्री क्रमांक तसेच 27567060 व 27567061 हे दोन संपर्कध्वनी क्रमांक सुरु आहेत. या टोल फ्री क्रमांकांना 4 ते 5 मल्टीपल लाईन्स जोडून घ्याव्यात जेणेकरुन हे क्रमांक व्यस्त राहणार नाहीत व नागरिकांना संपर्कासाठी सतत उपलब्ध राहतील असे निर्देश आयुक्तांनी दिले. या मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण कक्षाप्रमाणेच आठ विभाग कार्यालये व पाच अग्निशमन केंद्रे या ठिकाणीही नियंत्रण कक्ष सुरु करावेत व हे सर्वांचे संपर्क क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी व्यापक प्रमाणात प्रसिध्द करावेत असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

            नाले व गटारे सफाईच्या सुरु असलेल्या कामांना अधिक गती द्यावी व त्यामधून काढलेला गाळ लगेच उचलून घेण्यात यावा अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या. रस्त्यावरील  खोदकाम पूर्णपणे थांबविण्यात आले असून झालेल्या खोदकामांची पुनर्सुधारणा त्वरीत करुन घेण्यात यावी व त्याकडे बारकाईने लक्ष द्यावे असे निर्देश देण्यात आले. विशेषत्वाने एमआयडीसी क्षेत्रात सुरु असलेल्या कामांकडेही बारकाईने लक्ष देत संबंधित कार्यकारी अभियंता यांनी एमआयडीसी अधिका-यांशी समन्वय ठेवावा व ती कामेही पावसाळापूर्व पुर्ण करण्यावर भर द्यावा असेही निर्देशित करण्यात आले.

            विभाग कार्यालयांमार्फत अतिक्रमण व नगररचना विभाग यांच्या माध्यमातून धोकादायक इमारतींची पाहणी करुन त्याची यादी प्रसिध्द करण्यात यावी तसेच सी वन कॅटेगरीतील 66 इमारतींमधील रहिवास भविष्यात होणारी संभाव्य हानी टाळण्याच्या दृष्टीने बंद करण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या.  या धोकादायक इमारतींची यादी वेबसाईट व वर्तमान पत्रातून प्रसिध्द करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले. या सोबतच विभागात पाहणी करुन धोकादायक आढळणा-या इमारतींमधील रहिवास थांबविण्याची कार्यवाही पुढे कोणतीही हानी होऊ नये या दृष्टीने करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आल्या.

            पावसाळा कालावधीत नागरिकांना स्थलांतरीत करावे लागल्यास आपापल्या विभागातील समाज मंदिरे तसेच निवास जागा अशा तात्पुरत्या निवारा केद्रांची पाहणी करुन नियोजित यादी तयार करुन ठेवण्यात यावी तसेच आवश्यकता लक्षात घेऊन या निवारा केंद्रात नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करुन द्यायचा झाल्यास त्यांच्याकरीता खानपान व्यवस्थेचीही पूर्वतयारी करुन ठेवावी असे निर्देशित करण्यात आले.

            या सोबतच दरडप्रवण क्षेत्रामधील रहिवासी स्थलांतरीत करण्याबाबत तसेच नाल्यांमध्ये अडथळा आणणा-या झोपड्या स्थलांतरीत करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही सुचित करण्यात आले.

            पावसाळा कालावधीत उद्भवणा-या आजारांवरील प्रतिबंधात्मक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध्‍ करुन ठेवण्यात यावा तसेच रुग्णवाहिकाही तयार ठेवण्यात याव्यात असे आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले.

            मागील वर्षी घाटकोपर येथे घडलेली होर्डींग कोसळल्याची दुर्घटना लक्षात घेता महानगरपालिका क्षेत्रातील सर्व होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले असल्याबाबत खातरजमा करुन घ्यावी तसेच महानगरपालिका क्षेत्रात होर्डीग असलेल्या सर्व प्राधिकरणांना ऑडीट करण्याबाबतचे सूचनापत्र देण्यात यावे असेही आयुक्तांनी सूचित केले.

            पावसाळापूर्व कालावधीत सुरु असलेली वृक्ष छाटणीची कामे जलद पूर्ण करुन घेण्याबाबत उद्यान विभागास सूचित करतांनाच एपीएमसी मार्केट अंतर्गत स्वच्छता करुन घेण्यासाठी त्यांच्याशी समन्वय राखून काम करुन घेण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.

            जूनमध्ये शाळा सुरु होणार असून त्या अनुषंगाने इमारतींची आवश्यक दुरुस्ती करुन घ्यावी व तेथील सुविधांचीही तपासणी करावी आणि विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सुविधांची पुर्तता शाळा सुरु झाल्याबरोबर करण्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.  

            पावसाळापूर्व कामे जलद व काटेकोरपणे पूर्ण करुन पावसाळा कालावधीतही सर्व प्राधिकरणांशी समन्वय राखून नवी मुंबईकर नागरिकांना सुरक्षित सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सज्ज रहावे असे निर्देश देतानाच आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांशी सुसंवाद राखण्यासाठी सर्व माध्यमांचा प्रभावी उपयोग करावा असे सूचित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत