वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास भेट देत प्रधान सचिव श्रीम.अंशू सिन्हा यांनी व्यक्त केले समाधान
कच-यातील कपड्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणारा अभिनव प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत
केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत टेक्सटाईल कमिटीच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने टाकाऊ वस्त्रावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत सीबीडी बेलापूर येथे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीम. अंशू सिन्हा यांनी भेट देत प्रकल्पाच्या प्रक्रियेची बारकाईने पाहणी करत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्री. श्रीकृष्ण पवार, वस्त्रोद्योग मंत्री महोदयांचे स्वीय सचिव श्री. प्रल्हाद रोडे तसेच नवी मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे, टिसरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गणपती व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या भेटीदरम्यान हा अभिनव प्रकल्प सुरू करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल प्रधान सचिव श्रीम. अंशू सिन्हा यांनी प्रशंसा केली. या प्रकल्पाचे इतरही शहरांनी अनुकरण करावे असे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत वस्त्र उपयोगासाठी चांगले काम केले जात असून याव्दारे महिलांनाही कुशल बनवून त्यांना रोजगार उपलब्ध होत असल्याबद्दल प्रधान सचिव श्रीम. अंशू सिन्हा यांनी हा प्रकल्प बहुउपयोगी असल्याचे मत व्यक्त केले. वस्त्र कच-याच्या मोठया समस्येवर या प्रकल्पाव्दारे अत्यंत प्रभावी उपाययोजना केली जात असून यामध्ये टाकून दिलेली वस्त्रे आकर्षक स्वरुपात पुनर्निमित करुन वापरात येत आहेत. शाश्वततेसोबतच हा चक्रीकरणातून वस्त्र पुनर्वापराचा चांगला नमुना असल्याचे मत मांडत त्यांनी काम करणा-या महिलांशी संवाद साधला व कचरा संकलन, वर्गीकरण, त्यावरील प्रक्रिया अशा सर्वच बाबींची कार्यप्रणाली जाणून घेतली.
अंतर्गत विविध कार्यविभागांना भेटी देत प्रत्यक्ष कार्यवाहीची पाहणी केली. काम करतांना महिलांच्या चेह-यावर दिसणारा आनंद पाहून हे काम त्यांना आवडत असल्याचे बघून त्यांनी संतोष व्यक्त केला. यावेळी महिलांनीही त्यांना आम्हांला नवीन काही शिकण्याचा खूप आनंद मिळतो असे सांगितले. वस्त्र कच-याचे वर्गीकरण केल्यानंतर पुनर्प्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्यापासून काय बनवायचे याचे डिझायनींग करण्यातील कल्पकतेचे त्यांनी विशेष कौतुक केले.
वस्त्र मूल्य साखळीतील शाश्वतता आणि परिपूर्णता लक्षात घेत वापरानंतरच्या वस्त्रांचे सुयोग्य व्यवस्थापन करणारा हा प्रकल्प टाकून दिलेल्या कपड्याचे मूल्यवान उत्पादनामध्ये रुपांतर करीत असून याव्दारे स्थानिक कारागीरांना व त्यातही प्रामुख्याने महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध होत आहे.
या प्रकल्पांतर्गत टाकाऊ वस्त्रांचे संकलन करण्याकरिता पहिल्या टप्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 250 सोसायट्यांमध्ये जुने कपडे संकलन करण्याकरिता पेट्या ठेवण्यात येणार असून महानगरपालिकेच्या पुढाकाराने एस.बी.आय. फाउंडेशन लि. यांच्या मदतीने व टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत एकुण 47 सोसायट्यांमध्ये स्वतंत्र 49 पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित पेट्या टप्प्याटप्प्याने इतर सोसायट्यांमध्ये ठेवण्यात येत आहेत. लवकरच महानगरपालिका मुख्यालयासह आठही विभाग कार्यालये व नमुंमपा शाळांमध्येदेखील या पेट्या ठेवण्यात येणार आहेत.
टाकाऊ वस्त्राचे संकलन करणेकरिता स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून शहरात विविध ठिकाणी असलेले थ्री आर सेंटर्स व 47 सोसायट्यांमधून सद्यस्थितीत टाकाऊ वस्त्र संकलीत करण्यात येत आहे. बेलापूर येथील शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत, से.2, सीबीडी बेलापूर या ठिकाणी संकलित वस्त्रावर पुढील प्रक्रिया करण्याकरिता टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे.
टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने चांगल्या स्वरुपातील टाकाऊ वस्त्रांचे विलगीकरण करून हॅन्डलूमच्या सहाय्याने अप - सायकलींग करण्यात येत आहे. या प्रक्रियेत टाकाऊ कपड्यापासून विविध प्रकारच्या वस्तूंची पुनर्निर्मिती करण्यात येत आहे. तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे बाजारपेठेत प्रदर्शन करण्यात येणार असून त्यांची विक्रीही करण्यात येणार आहे. यामध्ये महिला स्वयंसहाय्यता बचतगटांची मदत घेतली जाणार आहे.
यामध्ये नागरिकांनी आपले पँट, शर्ट, जॅकेट, मोजे, पायजमे, स्कर्ट, ड्रेस, शॉर्टस, ब्लाऊज, पुरुषांचे शर्ट तसेच लहान मुलांचे कपडे त्याचप्रमाणे चादरी, स्वच्छतेसाठी वापरण्याचे टॉवेल सारखे कपडे, ब्लँकेट, बेड स्प्रेड्स, रजई, कंफर्टर, पडदे अशी वस्त्र सामग्री द्यावी. तथापि अस्वच्छ किंवा दूषित कपडे व वस्त्र सामग्री, वैद्यकिय वापराचे कपडे, सॅनेटरी पॅड, गाद्या, लेदर पर्स, पादत्राणे, बेल्ट, औद्योगिक कापड, अंतर्वस्त्रे देऊ नयेत असे सूचित करण्यात येत आहे.
हा प्रकल्प राबविल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाणा-या कच-याचा भार काही अंशाने कमी होत असून कचरा कमी करण्याप्रमाणेच महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे.
वापरानंतरच्या वस्त्रांचे व्यवस्थापन करण्याचा अभिनव प्रकल्प राबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची देशातून निवड करण्यात आली असून या अभिनव प्रकल्पाची प्रशंसा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव श्रीम. अंशू सिन्हा यांनी आज या प्रकल्पाची पाहणी करतांना हा प्रकल्प क्षेपणभूमीवर जाणारा कापडाचा कचरा कमी करुन त्या कपड्यावर पुनर्प्रक्रिया करीत त्यामधून कच-याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी बहुमोल योगदान देणारा असल्याचे अभिप्राय दिले.

Post a Comment