घोडबंदर येथील रस्ते दुरूस्तीची उर्वरित कामे 30 मे पर्यत पूर्ण करावीत – महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश



ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी २४ एप्रिलला करून सर्व कामे २० मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार संपूर्ण घोडबंदर रस्त्याची पाहणी गुरूवारी (२२ मे) आयुक्तांनी पाहणी केली. घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे ३० मे पर्यंत यूद्धपातळीवर पुर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग  व मेट्रो, एमएमआरडीए आदी प्राधिकरणांना दिले. तसेच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांच्या ठिकाणी सुचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू राहील या दृष्टीने नियोजन करण्याबाबतही सूचित केले.


              पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरबावडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या व पुर्ण झालेल्या कामांची  आज आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली. यावेळी  नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, वाहतूक विभाग, मेट्रोचे अधिक्षक अभियंता अभिजीत दिसीकर यांच्यासह महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीएचे अधिकारी, मेट्रो, विद्युत महावितरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            पावसाळ्यात घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून या रस्त्याची  सतत पाहणी करत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. संपूर्ण घोडबंदर रस्ता, गायमुख पर्यंत सुरू असलेली कामे पुर्ण होत आली आहेत, शेवटच्या टप्प्यातील कामे ३० मे पर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे पूर्ण करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


 ड्रेनेज, कलव्हर्टच्या साफसफाईचे काम सुरू


पावसाळ्यात घोडबंदर रोडवरील पाणी साचणार नाही यासाठी सर्व ड्रेनेज लाईन व कलव्हर्ट साफसफाई सुरू आहे. तसेच जुन्या ड्रेनेज लाईन या नवीन ड्रेनेज लाईनला जोडण्याचे काम सुरू असून 30 मे पूर्वी सर्व ड्रेनेज लाईन व कलव्हर्ट साफसफाईचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.


 कासारवडवली उड्डाणपुलाचे काम 5 जूनपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश


कासारवडवली येथील उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. या पुलाची पाहणी देखील आयुक्तांनी यावेळी केली. सद्यस्थितीत या पुलाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून उर्वरित कामे 5 जूनपर्यत पूर्ण करण्याचे निर्देश एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत