आदिवासी समाजाची आदर्श व लोकप्रिय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध - आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके


ठाणे,(जिमाका) :- आदिवासी समाज देव, देश, धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज आहे. आदिवासी समाजाची आदर्श व लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी आज येथे केले.

    आदिवासी स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177 व्या स्मृतीदिनानिमित्त ठाणे येथील कारागृहामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, हंसराज खेवरा, सुनिल भांगरे, अनिल भांगरे, विठ्ठल भांगरे, लकी जाधव, भूपाळा मामा, गोविंद साबळे, डॉ.सुपे, रामनाथ भोजने, राजेंद्र भांगरे, विश्वनाथ किरकिरे, बळवंत गावित, दिलीप परेकर, योगेश नम आदी उपस्थित होते.

       डॉ.उईके पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाचे क्रांतीवीर, क्रांतीकारक, स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177 व्या स्मृतीदिनानिमित्त सर्वदूर महाराष्ट्रात समस्त आदिवासी बांधवांच्या, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आदिवासी समाजाप्रती राघोजी भांगरे यांनी केलेले कार्य पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.

      आदिवासी समाजाला जल, जमीन, जंगलची मुक्ती मिळाली पाहिजे. आदिवासी समाजाचा विकास व्हायला हवा, तो मुख्य प्रवाहामध्ये यायला हवा. हा संकल्प घेवून केलेल्या क्रांतीमध्ये आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केले. 

     ते पुढे म्हणाले, अनेक वर्षापासून या ठिकाणी असलेली क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही भव्य मशाल यात्रा काढू. या मशाल यात्रेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या स्फूर्ती जिवंत ठेवण्याचा संकल्प घेवून सातत्याने नियमित कार्य सुरू आहे. आदिवासी विभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कल्पनेतून व आदिवासी विभागाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी केलेली क्रांती, त्यांच्या स्फूर्ती जपण्यासाठी जी जी स्थळे आहेत, त्या स्थळांचा स्थळ विकास महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये केला जाणार आहे. त्यांच्या स्फूर्ती जिवंत राहिल्या पाहिजेत, अशा प्रकारचा संकल्पच शासनाने केला आहे. 

    भगवान बिरसा मुंडांच्या जनजाती गौरव दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजातील क्रांतीवीरांच्या स्फूर्ती जपण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे सांगून डॉ.उईके पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादांना विनंती करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आदिवासी समाज आणि त्यांच्या स्फूर्ती जपण्यासाठी,  आदिवासी समाजाकरिता ज्या महापुरुषांनी, क्रांतीवीरांनी, राघोजी भांगरे यांनी 1930 साली जे केलेले कार्य आहे, क्रांती आहे त्या कार्याची महती सर्वांना माहीत व्हावे आणि क्रांतीवीर भांगरे यांना ठाण्यातील या कारागृहामध्ये बंदिस्त केले होते, या ठिकाणी राघोजी भांग्रे यांच्या स्फूर्ती जिवंत राहण्यासाठी या कारागृहाला त्यांचे नाव देण्यासाठी मी पुढाकार घेवून शासनाकडे विनंती करीन. या ठिकाणी राघोजी भांगरे यांचा इतिहास आदिवासी विभागाच्या पुढाकारातून विविध योजनांच्या माध्यमातून तो समाजापर्यंत पोहोचावयास हवा,अशी एखादी योजना निश्चित सुरू करू. त्या योजनेला राघोजी भांग्रे नाव देवून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू. या ठिकाणी आज त्यांना मनापासून भावपूर्ण  अभिवादन आहे.

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत