कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
कबर खणणे हा महाराष्ट्र धर्म नाही !
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
महोदय,
आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांची बेताल वक्तव्ये आणि त्यानंतर नागपूर व अन्य काही ठिकाणी घडलेले अनुचित प्रकार यामुळे अवघा महाराष्ट्र पेटला आहे, असं म्हणण्याचं कारण नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता अत्यंत संयमी आहे. सलोख्याचे वातावरण याही स्थितीत ती जपत आहे. पण राज्यातील लोकमने कलुषित झाली आहेत. सौहार्दाचे वातावरण काहीसे गढूळले आहे. नागपूरची घटना भयसूचक घंटा ठरू नये ?
मुख्यमंत्री म्हणून आपण स्वत: आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धार्मिक सलोख्याचे आणि संयमाचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील शांतताप्रिय जनता या आवाहनाला नक्कीच प्रतिसाद देईल. तथापि मने कलुषित करण्याचा प्रकार आपल्याच मंत्रीमंडळातील एक मंत्री नितेश राणे हे यापुढे तरी थांबवतील का ? हा प्रश्न आहे.
कोकणातील घटनांबाबत नितेश राणे यांचे ज्येष्ठ बंधू आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री उदय सामंत यांची संयमित वक्तव्ये आणि भूमिका स्वागतार्ह आहे. हीच संयमित भूमिका नितेश राणे यापुढे तरी स्वीकारतील का ?
महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याने, वारकरी संत परंपरेने, फुले - शाहू - आंबेडकरांच्या विचारधारेने एक लक्ष्मणरेषा आखून दिली आहे. ही लक्ष्मणरेषा महाराष्ट्रातील नेते आणि लोक ओलांडत नाहीत, हा आजवरचा इतिहास आहे.
छत्रपती संभाजीराजेंचा छळ करणारा औरंगजेब असेल किंवा महात्मा गांधींचा बळी घेणारा नथुराम असेल, महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरात जन्माला येणाऱ्या मुलांची नावे आजवर कुणी अपवादानेच त्यांच्या नावावरून ठेवली असतील. महाराष्ट्राचं समाजमन जाणायला आणि या लक्ष्मणरेषेचं महत्त्व ओळखायला, यापेक्षा आणखी कोणता पुरावा हवा ? यामुळे औरंगजेबाचं किंवा नथुरामाचं उदात्तीकरण केल्याचा आरोप समाजगटांवर होऊ नये.
दुसरा प्रश्न मल्हार सर्टिफिकेटचा. नितेश राणे यांनी या सर्टिफिकेटची घोषणा केली आहे. राज्य सरकारने अधिकृतपणे अशी काही योजना सुरू केली आहे काय ? याचा खुलासा होणे आवश्यक आहे. हिंदू खाटीक समाजाने सुद्धा अशा सर्टिफिकेटला विरोध केला आहे. राज्य घटनेनुसार शासनाला जाती किंवा धर्मावरुन भेदभाव करता येत नाही. महाराष्ट्राच्या वैचारिकतेचा कळस ज्या जगद्गुरु संत तुकाराम यांनी रचिला त्यांचाच दाखला आहे -
उंच नीच कांहीं नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्त देखोनियां।।
चर्म रंगूं लागे रोहिदासा संगें। कबिराचे मागें शेले विणी।।
सजन कसाया विकूं लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।।
नितेश राणे स्वत:ला संत तुकारामांपेक्षा मोठे मानत आहेत काय ? महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला सुद्धा नाकारत आहेत काय ? सजन कसायाला साक्षात विठ्ठलाने सर्टिफिकेट दिलं आहे. ही अंधश्रद्धा नाही. ही महाराष्ट्राच्या वैचारिक श्रद्धेची परंपरा आहे. कसाई मुलाणी हा गावगाड्याचा एक भाग आहे. या परंपरेचं भान आपण नितेश राणे यांना जरूर करून द्यावं.
कबर अफजलखानाची असो किंवा औरंगजेबाची. मराठ्यांच्या शौर्य आणि औदार्याची ती निशाणी आहे. द्वेष, नफरतीच्या आक्रमणाला इथेच गाडलं गेलं. अफजलखानाची कबर बांधून झाल्यावर त्याच्या बायको, पोरांना आपल्या महाराजांनी सुरक्षित आणि सन्मानाने परत पाठवलं. ज्या संभाजीराजेंचा छळ औरंगजेबाने केला त्याची कबर संभाजीराजेंचे वीरपुत्र थोरले शाहू महाराज यांना उद्ध्वस्त करता आली असती. पण त्यांनी तसं केलं नाही. उलट ज्या औरंगजेबाच्या मुलीने शाहू महाराज आणि त्यांच्या मातेला मदत केली त्याची आठवण साताऱ्यात जपली. अटकेपार झेंडे लावणाऱ्या पेशव्यांनी सुद्धा ती कबर कधी खणली नाही. हा महाराष्ट्र धर्म आहे. शत्रूच्या कबरीवर थुंकणे ही महाराष्ट्राची सभ्यता नाही.
खुद्द प्रभू रामाने रावणाला धारातीर्थी पाडल्यानंतर लक्ष्मणाला रावणाकडून उपदेश घेण्यासाठी पाठवलं होतं. या रामायणाची आठवण सुनील देवधर यांना करून द्यायला हवी.
अनुचित घटना एक घडो किंवा अनेक त्या तितक्याच गंभीर असतात. पण तेवढ्यावरुन महाराष्ट्राला बदनाम होऊ देता कामा नये. महाराष्ट्रात या घटनांमुळे गढूळलेलं वातावरण लवकरच निवळेल.
रमजान ईदला गळाभेट व्हावी. गुढी पाडव्याला बंधुभावाची गुढी उभारली जावी. सरकारकडून हीच अपेक्षा. धन्यवाद !
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
Post a Comment